China Threat : नेपाळच्या माध्यमातून भारताला शह देण्याची चीनची व्यूहरचना?

China Threat: China's strategy to Challenge India through Nepal?

एमपीसी न्यूज – भारताचे पारंपरिक मित्रराष्ट्र असलेल्या नेपाळला आपलेसे करून नेपाळच्या माध्यमातून भारताला शह देण्याची व्यूहरचना चीनने चालविली असल्याचे संकेत मिळत आहेत. नेपाळबरोबर चीनने हिमालयीन रेल्वेचा विकास या प्रकल्पाची घोषणा केली. हा प्रकल्प त्याच रणनीतीचा भाग असल्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे मत आहे.

हिमालयीन रेल्वेच्या माध्यमातून चीनला तिबेट आणि काठमांडू रेल्वेने जोडायचे आहे. त्यासाठी चीन आर्थिक गुंतवणूक करणार आहे. या लोहमार्गाची बांधणी चिनी लष्कराकडून केली जाणार आहे. हा लोहमार्ग भारत-नेपाळ सीमारेषेवरील लुंबिनीपर्यंत येणार आहे. त्यामुळे चीनचा हस्तक्षेप  नेपाळमधून थेट भारताच्या सीमारेषेपर्यंत येणार आहे, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

नेपाळमध्ये सव्वादोन वर्षांपूर्वी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या रूपाने साम्यवादी सरकार सत्तेवर आले. 65 वर्षीय ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-माओइस्ट आघाडीने डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत संसदेतील 275 पैकी 174 जागा जिंकल्या. तेव्हापासून चीन-नेपाळचे संबंध अधिकच मधुर झाले. आतापर्यंत भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या नेपाळवरील भारताचा प्रभाव कमी होऊन चीनचा प्रभाव वाढू लागला आहे. त्यातून आता नेपाळची भाषा बदलू लागली आहे. नेपाळ आता भारताविरूद्ध सूर आळवू लागला आहे.

ओली हे साम्यवादी असल्याने त्यांनी चीनला अनुकूल निर्णय घेण्याचा सपाटा लावला. चीनशी व्यापार करार, चीनबरोबर रेल्वे विकास किंवा नेपाळ-चीन इकॉनॉमिक कॉरिडॉर मंजुरी आदी चीनधार्जिण्या निर्णयांची मालिका ओली यांनी लावल्यामळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. नेपाळवर आता चीनचा प्रभाव प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला असून तो पूर्णपणे चीनच्या विळख्यात सापडला आहे, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

आधी पाकिस्तान, आता नेपाळ

चीनने 2016 पासून पाकिस्तानसोबत 42 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक असलेला इकॉनॉमिक कॉरिडॉर विकासाचा कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) या प्रकल्पात चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरची अंमलबजावणी सुरू आहे. यासाठीचा महामार्ग गिलगिट बाल्टिस्तानमधून जातो. त्या महामार्गाच्या बांधणीच्या निमित्ताने चिनी लष्करी अधिकारी तेथे आले आहेत. परिणामी, भारताच्या सुरक्षेला धोका आहे.

_MPC_DIR_MPU_II

आता पाकिस्तानप्रमाणेच नेपाळमध्येही चीन पाय पसरायला सुरूवात केली आहे. चीन-नेपाळ इकॉनॉमिक कॉरिडॉर विकास योजनेत रेल्वे विकास, रस्ते विकास प्रकल्प होणार असून, त्यानिमित्ताने चिनी लष्कर नेपाळमध्ये येणार आहे. एक प्रकारे हा भारताच्या सुरक्षेला अप्रत्यक्षपणे दिलेला धोक्याचा इशारा मानण्यात येत आहे.

नेपाळमधील भारताची मक्तेदारी मोडीत

भारत-नेपाळ संबंधात 2015 मध्ये तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांनी ओली चीनमध्ये गेले. त्या दौऱ्यात नेपाळमध्ये भारताची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रांत चीनशी करार करण्यात आले. यातून भारताची मक्तेदारी कमी करण्याचा चीनचा हेतू होता. या करारामुळे चीनच्या माध्यमातून नेपाळला वस्तूंचा पुरवठा सुरू झाला. दुसऱ्या करारात नेपाळमध्ये आजवर भारतामधून होणारी पेट्रोलियम पदार्थांची निर्यात कमी करून, ते चीनकडून घेण्यास सुरूवात केली.

नेपाळमधली 80 टक्के थेट परकीय गुंतवणूक चीनमधून येते. त्याच्या एक चतुर्थांश गुंतवणूक भारताकडून केली जाते. गेल्या काही वर्षांत चीनचा नेपाळवरील प्रभाव प्रचंड वाढला आहे. नेपाळच्या माध्यमातून चीनचे सैन्य अत्यंत कमी वेळात भारताच्या सीमेवर येऊ शकते; त्यामुळे भारताला सावध राहावे लागणार आहे. त्याच बरोबर नेपाळशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

भारतीय मुत्सद्देगिरीची परीक्षा

शेजारी राष्ट्रांच्या माध्यमातून भारतापुढील कटकटी वाढविण्याची रणनीती चीनने आखल्याचे संकेत मिळत आहेत. नेपाळ व पाकिस्तानच्या माध्यमातून पुढील काळात चीन अधिक आक्रमक होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर भारताला शेजारी राष्ट्रांशी जुळवून घेताना मुत्सदेगिरी पणाला लावावी लागणार आहे, असे मत परराष्ट्र व्यवहार क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.