Chinchwad : अहंकारी माणसाला जागविण्याचे काम संतांचे – प.पू. प्रतिभाकुंवरजी महाराज

एमपीसी  न्यूज –  कर्माने मिळविलेली संपत्ती, धन, वैभव, प्रतिष्ठा अहंकाराने लुप्त होते. संसारिक जीवन जगणारा मानव मद्‌, मत्सर आणि अहंकाराने भरलेला असतो. त्याला ‘जागविण्याचे काम’ संतांचे आहे. सुखाच्या शोधात जीवन व्यथित करणारा माणूस संतांच्या सान्निध्यात आल्यास त्याला शाश्वत सुख, शांती आणि आनंद मिळेल. आपले व आपल्या मुलांचे जीवन सार्थक होण्यासाठी व जीवनात परिवर्तन होण्यासाठी त्यांना संतांच्या सान्निध्यात आणा व संतांनी सांगितलेल्या मार्गावर परिक्रमा करण्याचे शिकवा, असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी निगडी येथे केले.

निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले आहे. यावेळी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या की, पालक आपल्या मुलांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायद्याचे व शक्य तेवढे भौतिक शिक्षण देण्याचे प्रयत्न करतात. त्यातून पैसे कमवून सुख मिळण्यासाठी साधने विकत घेतात, संपत्तीचा संचय करतात. पालक पैसे कमविण्याचे सांगतात तर शिक्षक भौतिक शिक्षण देतात; मात्र जीवन कसे जगावे याचे शिक्षण संत देतात. सुखाचा संबंध मेंदूशी आहे तर शांतीचा संबंध हृदयाशी आहे. धनसंचयाने सुख आले तरी मनातील लालसा कमी होत नाही. त्यासाठी मन आणि इंद्रियांवर ताबा मिळविण्याचा मार्ग तसेच शाश्वत सुख, आनंद आणि शांती संतांनी दाखविलेल्या मार्गानेच मिळते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.