Chinchwad Crime News : अबब ! दोन सराईत गुन्हेगारांकडून पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार आणि  पिस्टल जप्त

वाकड पोलिसांची दमदार कामगिरी

एमपीसी न्यूज – दरोडा, जबरी चोरी, खून यांसारख्या 15 गंभीर गुन्ह्यात मागील काही वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी 11 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कौतुक केले आहे.

विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय 31, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे), विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (वय 19, रा. पिसवली, कल्याण) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

20 सप्टेंबर रोजी वाकड रोड येथे पीआर ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान फोडून तीन किलो चांदी व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी निगडी येथील नावकर ज्वेलर्स मधून 20 किलो चांदीचे दागिने आणि 26 सप्टेंबर रोजी पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स हे दुकान फोडून पाऊण किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याबाबत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

एकापाठोपाठ झालेल्या या चोरीच्या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. वाकड पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर यांची दोन पथके तयार करून या गुन्ह्याचा तपास सुरु केला.

निगडी येथील सराफ दुकानापासून काही अंतरावर एक इको कार संशयास्पद आढळली. त्यावरून पोलिसांनी त्या कारचा शोध घेतला असता लोणी काळभोर आणि लोणीकंद येथून दोन इको कार चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी आपली शोधमोहीम पिंपरी-चिंचवड शहराच्या बाहेर खराडी, लोणीकंद, चंदननगर, वाघोली भागात सुरु केली. तब्बल दहा दिवस त्या परिसरात तळ ठोकून वाकड पोलिसांनी हे चोरीचे गुन्हे करत असलेल्या टोळीचा शोध लावला.

सराईत गुन्हेगार विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी आणि त्याची टोळी हे गुन्हे करत असून कल्याणी हा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कल्याणी हा दरोडा, जबरी चोरी, खून यांसारख्या 41 गंभीर गुन्ह्यात अटक होता. तसेच त्याच्यावर आणखी 15 गंभीर गुन्हे दाखल होते. त्या 15 गुन्ह्यात कल्याणी हा फरार होता. तो आपला अधिवास वारंवार बदलून राहत होता. तो नेहमी सशस्त्र वावरत असून त्याने यापूर्वी पोलिसांवर देखील गोळीबार केला आहे. त्यामुळे कल्याणी याला पकडणे हे पोलिसांपुढे आणखी मोठे आव्हान निर्माण झाले होते.

वाकड पोलिसांच्या तपास पथकाचे पोलीस नाईक प्रमोद कदम यांना माहिती मिळाली की, एका व्हेरना कारमधून आरोपी कल्याणी फिरत आहे. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने सापळा लाऊन व्हेरना कार (एम एच 05 / ए एक्स 9376) सह आरोपी कल्याणी आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले.

कारची पाहणी केली असता कल्याणी याच्या कारमध्ये दोन लोखंडी कटावण्या, दोन कटर, सहा स्क्रू ड्रायव्हर, एक स्प्रे कॅन मिळाला. तर कल्याणी याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे मिळाली.

त्याने वाकड रोडवरील पीआर ज्वेलर्स हे दुकान फोडल्याची कबुली दिली. त्यावरून दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस कोठडीत असताना अटक केलेल्या आरोपींनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांसोबत मिळून वाकड (5 गुन्हे), चिखली (5 गुन्हे), देहूरोड (3 गुन्हे), निगडी (6 गुन्हे), पिंपरी (3 गुन्हे), चिंचवड (2 गुन्हे), सांगवी (2 गुन्हे), भोसरी (2 गुन्हे), एमआयडीसी भोसरी (2 गुन्हे), हिंजवडी (1 गुन्हा), लोणी काळभोर (1 गुन्हा), लोणीकंद (1 गुन्हा), वालीव (1 गुन्हा) या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण 34 गुन्हे केल्याचे सांगितले.

त्या गुन्ह्यातील एक कोटी 11 लाख 37 हजार रुपयांचे 750 ग्राम सोने, 100 किलो चांदी, तीन कार, एक पिस्टल, पाच काडतुसे, कटावण्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, जावेद पठाण, वजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरज सुतार, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, शाम बाबा, नितीन ढोरजे, दीपक भोसले, सचिन नरुटे, प्रमोद भांडवलकर, प्रमोद कदम, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.