Chinchwad : लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिंद्रा कंपनीकडून पिंपरी चिंचवड पोलिसांना 10 वाहने

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना आणखी गस्त घालून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी, यासाठी महिंद्रा कंपनीकडून 10 कार देण्यात आल्या आहेत. या कारवरील चालक देखील कंपनीकडून पुरविण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केले आहे. दरम्यान संचारबंदीचे आदेशही जारी करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करणाऱ्या ठिकाणांसह एकूण 80 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 65 चेकपोस्ट उभारण्यात आला आहेत. चेकपोस्ट, नाकाबंदीची ठिकाणे यासह पोलीस शहराच्या अंतर्गत भागातही गस्त घालून संचारबंदीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत.

पिंपरी चिंचवड पोलिसांकडे 83 दुचाकी आणि 89 चारचाकी वाहने आहेत. मात्र, सध्या असलेली ही वाहने प्रभावी गस्त घालण्यासाठी कमी पडत आहेत. पोलिसांची ही अडचण दूर करण्यासाठी महिंद्रा कंपनी पुढे आली आहे. त्यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत पोलिसांना गस्त घालण्यासाठी दहा कार उपलब्ध करून दिल्या आहेत. या कारवरील चालकही कंपनीकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांना वाहने उपलब्ध झाल्यामुळे आगामी लॉकडाऊनच्या काळात आणखी प्रभावी गस्त घालण्यासाठी मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.