Chinchwad : गस्तीसाठी बजाज ऑटो कडून पिंपरी चिंचवड पोलिसांना 29 दुचाकी

एमपीसी न्यूज – शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी बजाज ऑटो कडून 29 दुचाकी पिंपरी चिंचवड पोलिसांना देण्यात आल्या. पिंपरी चिंचवड पोलिसांकडे असलेल्या अपुऱ्या वाहनांची गौरसोय लक्षात घेत बजाज ऑटोने हा मदतीचा हात पुढे केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना आणखी प्रभावीपणे गस्त घालून त्याची अंमलबजावणी करता यावी यासाठी महिंद्रा कंपनीकडून 11 एप्रिल रोजी 10 कार देण्यात आल्या आहेत. या कारवरील चालक देखील कंपनीकडून पुरविण्यात येणार आहेत. त्यानंतर बिट मार्शलची गस्त वाढावी यासाठी बजाज ऑटो कडून 29 दुचाकी पिंपरी चिंचवड पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. दरम्यान संचारबंदीचे आदेशही जारी करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करणाऱ्या ठिकाणांसह एकूण 80 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 65 चेकपोस्ट उभारण्यात आला आहेत. चेकपोस्ट, नाकाबंदीची ठिकाणे यासह पोलीस शहराच्या अंतर्गत भागातही गस्त घालून संचारबंदीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत.

पिंपरी चिंचवड पोलिसांकडे 83 दुचाकी आणि 89 चारचाकी वाहने आहेत. मात्र सध्या असलेली ही वाहने प्रभावी गस्त घालण्यासाठी कमी पडत आहेत. पोलिसांची ही अडचण दूर करण्यासाठी शहरातील कंपन्या पुढे येत आहेत. त्यामुळे पोलिसांना शहरात संचारबंदीची अंमलबजावणी तसेच सशक्त पोलिसिंग करण्यासाठी मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.