Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव कालावधीत (Chinchwad) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात तीन हजार पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्याशिवाय विविध पथके कार्यान्वित केली असून संशयित बाबींवर निगराणी ठेवण्यासाठी सर्वेलंस व्हॅन देखील गर्दीच्या ठिकाणी लावली जाणार आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड हजार पेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. परवानगी न घेता गणेशोत्सव साजरा करणारी देखील काही मंडळे असतात. गणेशोत्सव कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर येते. पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवासाठी बाहेरून बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात गणेशोत्सवासाठी अपर पोलीस आयुक्त (1), उपायुक्त (5), सहायक आयुक्त (8), पोलीस निरीक्षक (50), सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक (145), अंमलदार (1840) एवढे मनुष्यबळ उपलब्ध आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या जोडीला अधिकची कुमक देऊन गणेशोत्सव काळात बंदोबस्त केला जाणार आहे.
चार पोलीस निरीक्षक, 20 सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक, 400 अंमलदार, 600 होमगार्ड, एसआरपीएफच्या दोन कंपनी आणि बीडीडीएसचे दोन पथक एवढी अधिकची कुमक शहर पोलिसांना मिळाली आहे.
Chakan : महावितरणचे कर्मचारी भासवून वीजमीटर बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शेकडो गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. गणेशोत्सव शांततेत (Chinchwad) पार पडण्यासाठी मंडळांना पोलिसांनी गर्दी, आवाज, सुरक्षा आदींबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक मंडळाचे पाच प्रतिनिधी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी नियुक्त केले आहेत. यासोबत ग्रामरक्षक दल, शांतता कमिटीची देखील मदत घेतली जाणार आहे.
गणेशोत्सव कालावधीत पाच दिवस रात्री बारा पर्यंत ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवानगी दिली आहे. पाचवा दिवस (23 सप्टेंबर), सहावा दिवस (24 सप्टेंबर), आठवा दिवस (26 सप्टेंबर), नववा दिवस (27 सप्टेंबर), दहावा दिवस (28 सप्टेंबर) या दिवशी ही परवानगी असेल. सातव्या दिवशी अनेक भागातील विसर्जन होते. मात्र त्यादिवशी ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्री दहा वाजता ध्वनिक्षेपक बंद करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहरातील पोलीस बंदोबस्त
- अपर पोलीस आयुक्त – 1
- पोलीस उपायुक्त – 5
- सहायक पोलीस आयुक्त – 8
- पोलीस निरीक्षक – 54
- सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक – 165
- अंमलदार – 2240
- होमगार्ड – 600
- एसआरपीएफ – 2 कंपनी (200 जवान)
- बीडीडीएस – 2 पथक