BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : गझल मुशायऱ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

INA_BLW_TITLE

एमपीसी  न्यूज –   गझलसम्राट सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त  पिंपरी-चिंचवडच्यावतीने गझलपुष्प  मराठी गझल मुशायऱ्याचे चिंचवड येथे आयोजन केले होते. 

या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधू जोशी, प्रा. तुकाराम पाटील, सुरेश कंक, राजेंद्र घावटे, भाग्यश्री कुलकर्णी, अशोक कोठारी उपस्थित होते. या कार्यक्रमात शृंगार, प्रेम, विरह, निसर्ग, देशभक्ती, सामाजिक जाणिवा अशा विविध विषयांवरील शेर असलेल्या गझला रसिकांच्या मनाला स्पर्शून गेल्या.

  • गझलकार संतोष घुले यांच्या, “तुझ्या त्या मुक्त केसांनी मला घायाळ केले… मनाच्या उंबऱ्यावर तूच मायाजाळ केले!” या गुलाबी गझलेने रसिकमनाला धुंद केले; तर “आयुष्या मी रोज तुझ्याशी भांडत आहे… काय खरे ते वेळोवेळी सांगत आहे!” असा प्रारंभ करीत नीलेश शेंबेकर यांनी आयुष्याची घेतलेली झाडाझडती श्रोत्यांना भावली.

चंद्रकांत धस यांनी, “शब्द बेताल ते गाळलेले बरे बोलणे अन्यथा टाळलेले बरे” असा सावध पवित्रा घेत आपल्या सुरेल सादरीकरणातून रसिकांवर गारुड केले. “मला तू भेटलीस तेव्हा कसे सारे बरे झाले… जगाचे बोल खोटे अन् नशिबाचे खरे झाले!”

  • हा प्रेयसीवरील आपला विश्वास सार्थ असल्याचे गणेश पवार यांनी आपल्या गझलेतून ठासून सांगितले. बी.एस.बनसोडे यांनी सुरेश भट यांना आपल्या रचनेतून आदरांजली वाहत, “शब्द शस्त्रासारखा जपलास तू… वार वीरासारखा केलास तू!” अशा भावना व्यक्त केल्या.

रसिकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे गझल सादरीकरणाच्या तीन फेऱ्या अतिशय रंगतदार झाल्या. मान्यवरांच्या हस्ते सहभागी गझलकारांना सन्मानित करण्यात आले.

  • मुशायऱ्याच्या संयोजनात अभय पोकर्णा, मीना पोकर्णा, प्रवीण पोकर्णा, नितीन हिरवे, सुहास घुमरे, अभिजित काळे, रघुनाथ पाटील, संदीप जाधव, समृद्धी सुर्वे, प्रदीप गांधलीकर यांनी परिश्रम घेतले. सुरेश भट यांच्या आठवणी, किस्से, शेरोशायरी उद्धृत करीत दिनेश भोसले यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. बी.एस.बनसोडे यांनी आभार मानले.
HB_POST_END_FTR-A4

.