_MPC_DIR_MPU_III

Chinchwad : रिकाम्या रस्त्यांवरही होताहेत अपघात; वाहन चालवताना निष्काळजीपणा न करण्याचे पोलिसांचे आवाहन

एमपीसी न्यूज – सध्या लॉकडाऊनमुळे रस्ते ओस पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरून केवळ जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा पुरविणारी वाहने धावत आहेत. अशा परिस्थितीत देखील अपघात घडत आहे. या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी निष्काळजीपणे वाहने चालवू नये,  असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 20 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. सुरुवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यात  आणखी 19 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. संचारबंदीचे आदेश लागू केल्याने नागरिकांना घराबाहेर फिरण्यावर देखील बंधने आली आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई  करून वाहने जप्त केली जात आहेत.

अशा परिस्थितीत देखील रिकाम्या रस्त्यावर अपघात होत आहेत. ही गंभीर बाब आहे. रिकाम्या रस्त्यांवरून वाहन चालक भरधाव वेगात वाहने चालवत असल्याने अपघातांची शक्यताही तेवढीच वाढत आहे. मंगळवारी सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हलर आणि दुचाकीच्या अपघातात एका दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला. यामध्ये चूक कोणाची हा तपासाचा भाग असला तरीही रिकाम्या रस्त्यांवर अपघात होत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  रिकामे रस्ते असल्यामुळे भरधाव वेगात वाहने चालवून पटकन घर गाठण्याची घाई असते. पण हे चुकीचे आहे. चौकात, वळणांवर कुठल्याही बाजूने वाहने येऊ शकतात. त्यामुळे प्रसंगावधान राखून वाहने चालवायला हवीत. मनोज पानसरे : वाहतूकदार 

  मोकळ्या रस्त्यांवरून वाहने भरधाव वेगात चालवणे धोक्याचे आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास त्यावर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. भरधाव वेगात वाहने चालवल्यामुळे अपघात होऊन त्यात जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे वाहन चालकांनी स्वतः काळजी घेणं जास्त गरजेचे आहे.  नीलिमा जाधव  : सहाय्यक पोलीस आयुक्त , वाहतूक विभाग. 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.