Chinchwad: शासकीय आदेश डावलून ट्यूशन क्लास घेणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई

Chinchwad: Action taken against a teacher who took tuition class in defiance of government order माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे प्रकार आला उघडकीस

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्ग आणखी वाढू नये म्हणून शासनाने दिलेल्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांप्रमाणेच खासगी क्लासेस घेण्यासही बंदी आहे, मात्र हा आदेश डावलून खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षिकेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सुलभा शशिकांत झनकर (वय 55, बळवंत दर्शन, तानाजीनगर, चिंचवड) असे कारवाई झालेल्या शिक्षिकेेचे नाव आहे.

शासनाने मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक उद्योग, व्यवसाय, सेवा पुन्हा सुरू करण्यास टप्प्याटप्प्याने परवानगी दिली असली तरी शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, खासगी क्लासेस सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी दिलेली नाही. तरी देखील तानाजीनगर भागात एक शिक्षिका खासगी क्लास घेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते प्रदीप नाईक यांना मिळाली. त्याबाबत नाईक यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

पोलीस नाईक लक्ष्मण डामसे व पोलीस शिपाई अरुण वाल्हे यांनी समक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता घरामध्ये पाच विद्यार्थिनींची शिकवणी सुरू असल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने ती शिकवणी बंद करायला लावून शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असून शासनाने व स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून प्रत्येकाने स्वतःची तसेच इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.