Chinchwad : अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पदभार स्वीकारला

एमपीसी न्यूज – रामनाथ पोकळे यांनी बुधवारी (दि. 29) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथून त्यांची पदोन्नतीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त पदावर बदली झाली आहे. आयुक्तालयाचे पाहिले अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पोकळे यांच्याकडे पदभार सोपवला.

मकरंद रानडे यांची पोलिस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांची अमरावती परिक्षेत्र येथे बदली झाली आहे. तर राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथून रामनाथ पोकळे हे पदोन्नतीवर अतिरिक्त (उपमहानिरीक्षक) आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात रुजू झाले आहेत. पोकळे यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण पोलिस दलात अतिरिक्त अधीक्षक, पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त, सीआयडी पुणे येथे काम केले आहे. तसेच पदोन्नतीवर पोकळे यांनी जालना जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून देखील काम पाहिले.

  • मकरंद रानडे म्हणाले, “पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पहिला अप्पर पोलीस आयुक्त म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. आयुक्तालय सुरू झाल्यानंतर दहा महिने काम करता आले. हा कालावधी कमी असला तरी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक गोष्टी शिकता आल्या. दहा महिन्यांच्या कार्यकाळात आयुक्तालयाची‌ इमारत निश्चित करणे, मुख्यालय सुरू करणे, वाहतूक शाखा सुरू करणे यासह लोकसभा निवडणूक, गणेशोत्सव आणि अन्य सणांचा बंदोबस्त यशस्वीपणे पार पडताना आयुक्तालयातील सर्वांचे सहकार्य मिळाले.”

रामनाथ पोकळे म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहराचे पाहिले पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या कल्पनेतून सध्या अनेक योजना सुरू आहेत. या योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जालना जिल्ह्यात पोलिसांसाठी राबविलेल्या योजनांना राज्यात प्रथम क्रमांक मिळाला होता. या योजना पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यावर भर दिला जाणार आहे. शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी स्ट्रीट क्राईम रोखणे हे प्रमुख उदिष्ट असणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like