Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिसांना सुरक्षा साधनांचे वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील सर्व पोलिसांना सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. मंगळवारी (दि. 21) पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतर राखत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव आदी उपस्थित होते.

100 मिली सॅनिटायझर, एक फेस शील्ड, दोन कापडी मास्क, एक एन 95 मास्क, विटामिन सी टॅबलेट कॅप्सूल प्रत्येकी 20, एक जोड हॅन्डग्लोज, एक गॉगल अशा साहित्याचे किट प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात आले. एकूण 3 हजार संरक्षण किटचे वाटप करण्यात आले.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कोरोना विषाणूशी लढण्यासाठी अभिनंदन केले. आयुक्त म्हणाले, “कोरोना विषाणूची लढाई पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. या काळात प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतःची तसेच परिवाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

परिवारातील व्यक्ती भाजीपाला किंवा अन्य साहित्य आणण्यासाठी घराबाहेर पडतील तेव्हा त्यांना पूर्ण सुरक्षेची काळजी घेऊन बाहेर पडण्यास सांगावे. अत्यावश्यक कारण नसताना घराबाहेर पडणे टाळावे. पोलीस वसाहतीमध्येच भाजीपाला उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या परिवाराला यातून वाचवण्यासाठी सर्व गोष्टींची जाणीव करून द्यावी.

रमजान हा सण जवळ येत आहे. त्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांना कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीआरपीसी कलम 144 नुसार पारित करण्यात आलेल्या आदेशाबाबत प्रबोधन करावे. आयुक्तालयातील कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली, तर त्यांनी घाबरून जाऊ नये. आपण सर्वजण सोबत आहोत. हिमतीने काम करा. स्वतःला एकटे समजू नका. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राखीव पोलीस निरीक्षक, मुख्यालय राजकुमार माने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.