Chinchwad : राहुल कलाटेप्रकरणी ‘त्या’ अधिकाऱ्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करा; सर्वपक्षीय नगरसेवकांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – नागरिकांना वेठीस धरून नगरसेवकांनाही अरेरावी करणाऱ्या आणि भर सभेत नगरसेवकांना चोप देण्याची भाषा करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यावरही दखलपात्र गुन्हे दाखल करा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पोलीस आयुक्‍त आर. के .पद्‌मनाभन यांच्याकडे केली.

याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्‍तांची भेट घेतली. त्यांच्यावतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले. विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, मनसे गटनेते सचिन चिखले, संदीप वाघेरे, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, उत्तम केंदळे, संदीप कस्पटे, नवनाथ जगताप, अमित गावडे, सचिन भोसले, मीनल यादव, पौर्णिमा सोनवणे, रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे, कैलास बारणे, राजू बनसोडे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, शाम लांडे, निलेश वराळे, बाबा कांबळे आदींनी निवेदनावर स्वाक्षरी केल्या आहेत.

  • आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘नगरसेवक जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे ते जनतेची कामे करण्याची अधिका-यांना विनंती करतात. तेच राहुल कलाटे यांनी केले. 13 फेब्रुवारी रोजी सरकारी कर्मचारी अनिल राऊत यांनी गुन्ह्याची तक्रार केली. पिंपरी पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या दबावाखाली कोणतीही चौकशी न करता गुन्हा दाखल केला. त्यानंतर सर्व कर्मचारी संघाने चुकीची भाषा वापरत आंदोलन केले.

सरकारी कर्मचारी अनिल राऊत यांच्यावर संतोष कामठे गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल न करता केवळ अदखपात्र गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे महापालिकेतील 133 नगरसेवक भीतीच्या वातावरणाखाली वावरत आहेत. त्यांना सुरक्षेची योग्य हमी द्यावी. तसेच सरकारी कर्मचारी अनिल राऊत यांच्यावर देखील दखलपात्र गुन्हा दाखल करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.’

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले, “शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केलेल्या मारहाणीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांच्याकडे दिला आहे. नगरसेवकाला चोप देण्याची भाषा करणाऱ्याच्या विरोधात तक्रार द्या. गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.