Chinchwad : ‘वाहनचोरी प्रतिबंधक पथक’ पुन्हा होणार ‘सक्रिय’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी वाहनचोरी प्रतिबंधक पथकाची निर्मिती केली आहे. मात्र, मागील काही दिवसांमध्ये विविध अडचणी आणि कामाच्या व्यापामुळे या पथकाला मरगळ आली होती. त्यामुळे पथकात काही बदल करून पुन्हा सक्रिय करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिल्या आहेत.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत सोमवारी (दि. 3) संबंधित अधिका-यांची बैठक बोलावली. या बैठकीत वाहनचोरी प्रतिबंधक पथकाला पुन्हा सक्रिय करण्यासाठी नव्याने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पूर्वी या पथकामध्ये एक अधिकारी आणि कर्मचारी देण्यात आले होते. मात्र, पथकातील अधिकारी आणि कर्मचा-यांवर गुन्हे शाखेच्या कामाचा देखील ताण होता. या पथकाला पूर्णवेळ वाहनचोरीच्या गुन्ह्यांकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे पथकातील अधिकारी आणि कर्मचा-यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे.

सुरुवातीला स्थापन केलेल्या वाहनचोरी विरोधी पथकातील काही कर्मचारी आणि नव्याने काही कर्मचारी घेऊन पथकाची पुनःरचना करण्यात येणार आहे. यामध्ये दोन अधिकारी आणि दहा कर्मचारी असतील. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साळी आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक चामले हे अधिकारी असणार आहे. या दोन्ही अधिका-यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांचे मार्गदर्शन असेल. तर, या पथकाचे प्रमुख म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील काम पाहणार आहेत.

वाहनचोरी प्रतिबंधक पथकाचे कामकाज पूर्वी महाळुंगे-चाकण येथून चालत होते. शहराच्या एका बाजूला कामकाज चालत असल्याने आयुक्तालयाच्या संपूर्ण भागात लक्ष ठेवणे जिकरीचे होत होते. या पथकाला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असायला हवे. यासाठी पोलिसांनी जागेचा शोध सुरु केला आहे. नवीन मध्यवर्ती जागेत पथकाचे काम सुरु होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.