Chinchwad : राजर्षी शाहू महाराज उड्डाण पुलाखालील जागेचा अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकास करा

नगरसेविका अनुराधा गोरखे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील राजर्षी शाहू महाराज उड्डाणपुलाखालील जागेचा अर्बन स्ट्रीट डिझाईनअंतर्गंत विकास करावा. नागरिकांसाठी उद्यान,जॉगिंग ट्रक, बसण्यासाठी लॉन, बेंचेस आणि खुली व्यायामशाळा अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. राजर्षी शाहू महाराज उड्डाण पुलाखाली मोकळी जागा असून ही जागा पूर्णपणे पडीक आहे. या जागेचा अर्बन स्ट्रीट डिझाईनअंतर्गंत विकास करून तेथे उद्यान सुरू करावे. त्या उद्यानअंतर्गत जॉगिंग ट्रक, बसण्यासाठी लॉन, बेंचेस, रंगीबेरंगी फुलांची रांगोळी, उड्डाण पुलाच्या पीलर्सच्या बाजूने आकर्षक विद्युत रोषणाई, ज्येष्ठ नागरिकाना बसण्यासाठी कट्टा, खुली व्यायामशाळा, तसेच विविध खेळांच्या सोयीसुविधा कराव्यात.

या सुविधा तेथे उपलब्ध करुन दिल्यास नागरिकांसाठी हे उद्यान नवा मानदंड ठरेल. शहराच्या विकासाला नवी झालर प्राप्त करून देण्याच्या दृष्टीकोनातून, तसेच वापरात नसलेल्या जागेचा पर्याप्त व लोकोपयोगासाठी वापर व्हावा. या भावनेतून या संकल्पनेची सुरुवात प्रभाग क्रमांक 10 मधील राजर्षी शाहू महाराज उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागेत करावी, अशी मागणी गोरखे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.