Chinchwad : मावळच्या सर्वांगीण विकासासाठी पार्थला साथ द्या – अजित पवार

एमपीसी न्यूज – भारतात युवकांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यादृष्टीने शिरुर आणि मावळ मतदारसंघात युवा चेहरे उमेदवार म्हणून दिले आहेत. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मावळातून पार्थ याला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व माझ्याकडे केली होती. त्यानुसार मावळातून पार्थ तर शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे या उच्चशिक्षित तरुणांना उमेदवारी दिली आहे. मावळ व शिरूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना साथ द्या. स्वतः पुढाकार घेऊन प्रचाराची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. 

मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट) गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार आणि शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पिंपरी-चिंचवड शहर जूलूस कमिटीच्या वतीने चिंचवड येथील एका कार्यक्रमात काल बिनशर्त पाठिंबा देण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, प्रसाद शेट्टी, फजल शेख यांच्या उपस्थितीत जूलूस कमिटीचे अध्यक्ष नियाज सिद्धीकी यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. त्यावेळी कमिटीचे माजी अध्यक्ष हबीब शेख, हाजी गुलामरसूल सय्यद, सचिव हाजी अकबर मुल्ला, मुस्तफा शेख, युसूफ कुरेशी, याकुब खान, जमीर मुल्ला, जुम्मन खान, अजहर खान, इम्रान बीजापूरे, जाफर मुल्ला, मुन्ना शेख आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, “निवडणूका आल्या की हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण केली जाते. ‘मंदिर वही बनायेंगे’ असे प्रश्न निर्माण करून दोन समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. भाजपा व शिवसेना विशिष्ट वर्गालाच नजरेसमोर ठेवून निर्णय घेत आहे. देशात अठरा पगड समाज आहे. त्यासाठी सर्वांचा विकास करणार्‍या सरकारची आज आवश्यकता आहे. मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षणाचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. त्याची अंमलबजावणी हे सरकार करीत नाही. याचा प्रत्येकाने विचार करावा”

मागील लोकसभा निवडणुकीत जुमलेबाजी करून केंद्रात सभा मिळविली याची जाणीव आता सगळ्यांना प्रकर्षाने होत आहे. मोदी यांनी 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 2 कोटी बेरोजगारांना नोकर्‍या, 15 लाख प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा होतील, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झालेले नाही. शेतकर्‍यांना कर्जमाफी आदी प्रश्नांकडे सरकार डोळे झाक करत आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

माझ्या कारकिर्दीत पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास केला आहे. तरीही, अल्पसंख्यांक समाजाचे व इतरांचे काही प्रश्न प्रलंबित आहे, याची मला जाणीव आहे. त्याची पूर्तता निवडणुकीनंतर केली जाईल. त्यासाठी आपले सहकार्य देखील अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले. तसेच बिनशर्त पाठींबा दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.