Chinchwad: चिंचवड येथील विरंगुळा केंद्रासाठी वास्तुविशारदाची नेमणूक

एमपीसी न्यूज – चिंचवड – दळवीनगर प्रभाग क्रमांक 21 येथे विरंगुळा केंद्र बांधण्यासाठी निविदापूर्व आणि निविदा पश्चात कामे करण्याकरिता वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना दोन्ही कामांकरिता मिळून प्रकल्प खर्चाच्या 1.98 टक्के शुल्क देण्यात येणार आहे.

चिंचवड – दळवीनगर प्रभाग क्रमांक 21 येथे विरंगुळा केंद्र बांधण्यात येणार आहे. या कामाअंतर्गत टेबल टेनिस, कॅरम या इनडोअर खेळांची सोय करण्यात येणार आहे. या कामासाठी या ठिकाणचे नकाशे, अंदाजपत्रके तयार करण्यासाठी आणि आवश्यक परवानग्या घेण्यासाठी महापालिका पॅनलवरील वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात येणार आहे. वास्तुविशारद नेमणुकीबाबत शहर अभियंता कार्यालयात समितीची बैठक झाली. या बैठकीत वास्तुविशारद शिल्पी आर्कीटेक्ट अ‍ॅण्ड प्लॅनर्स यांनी या कामाचे सादरीकरण केले. हे सादरीकरण समाधनकारक असल्याने छाननी समितीने त्यास मान्यता दिली. त्यानुसार त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

या कामासाठी वास्तुविशारद म्हणून कामाचे आराखडे तयार करून मंजुरी घेणे, बांधकाम परवानगी घेणे, पुर्वगणक पत्रक तयार करणे, निविदा बनविणे आदी निविदापूर्व कामे केलेली असून निविदा पश्चात कामे करावी लागणार आहेत. तांत्रिकदृष्ट्या आराखडा तयार करून त्याप्रमाणे काम करून घेणे, प्रकल्पाच्या दैनंदीन कामावर देखरेख करणे, निविदा निर्देशानुसार गुणवत्ता तपासणी करणे आदी कामांकरिता वास्तुविशारद नेमणे अत्यंत आवश्यक आहे.

शिल्पी आर्कीटेक्ट अ‍ॅण्ड प्लॅनर्स यांनी यापूर्वी देखील अशा प्रकारची कामे केलेली आहेत. सध्या काही कामे प्रगतीपथावर आहेत. त्यांनी महापालिकेला आतापर्यंत वेळोवेळी आवश्यक मागणीनुसार, सेवा दिली आहे. त्यानुसार हे काम तांत्रिक दृष्ट्या करून प्रत्यक्ष जागेवर नियोजित वेळेत काम होण्याच्या दृष्टीने शिल्पी आर्कीटेक्ट यांची नेमणूक करून निविदा पूर्व कामासाठी 1.23 टक्के आणि निविदा पश्चात कामाकरिता 0.75 टक्के असे एकूण 1.98 टक्के या महापालिका मंजुर दराने त्यांना शुल्क देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.