Chinchwad : आरोग्य मित्र फाऊंडेशनचा रविवारी लोकार्पण सोहळा, प्रशिक्षणार्थी ‘आरोग्य मित्रांना’ प्रमाणपत्रांचे वाटप

एमपीसी न्यूज – अपघातात जखमी झालेल्यांना योग्यवेळी रुग्णालयात पोहचविण्यासाठी आरोग्य मित्र फाऊंडेशने प्रशिक्षणार्थी ‘आरोग्य मित्र’ तयार केले आहेत. पहिल्या वर्षात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आरोग्य मित्रांना प्रशिक्षण पत्र देण्यात येणार असून दुस-या आरोग्य मित्रांची बॅच जाहीर केली जाणार आहे. त्याकरिता आरोग्य मित्र फाऊंडेशनचा येत्या रविवारी (दि.12)लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.

चिंचवड, सायन्स पार्क येथे रविवारी (दि.12) सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अपघातात जखमी झालेल्यांना योग्यवेळी रुग्णालयात पोहचविण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ निर्माण करण्याकरिता पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, भावसार व्हीजन, लोकमान्य हॉस्पिटल, रोशनी, कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन संचलित पोलीस नागरिक मित्र या संस्थांनी गतवर्षी आरोग्य दिनादिवशी ‘आरोग्य मित्र’ हा उपक्रम हाती घेतला होता. त्यामध्ये निगडीतील लोकमान्य रुग्णालय यांच्यासह शहरातील नामांकित डॉक्टरांच्या मदतीने पहिल्या बॅचचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. आता रुग्ण, रुग्णालय अन्‌ डॉक्टरांमध्ये समन्वय साधण्याचे काम हे आरोग्य मित्र करणार आहेत.

आरोग्य फाऊंडेशनची स्थापना स्वयंसेवी संस्था म्हणून करण्यात आली आहे. समाज व आरोग्यदायी सेवा यात समन्वय साधने, त्याचे व्यवस्थापन करणे त्यामागचा हेतू आहे. वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना अनेक आरोग्य विषयी समस्या उद्भवतात. शहरांमध्ये वाढणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे हृदयविकारांचे प्रमाण वाढत आहे. प्रदूषण आणि वातावरणाच्या बदलामुळे अनेक साथीचे प्रमाण वाढले आहे. व्हॉटसअप व इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे तरुणाई वेगळ्या मार्गावर जात आहे. एक प्रकारे सामाजिक आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी एकत्र येऊन गतवर्षी रुग्ण, रुग्णालय आणि डॉक्टर यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी, जनजागृतीसाठी आरोग्य मित्र फाऊंडेशनची स्थापना केली आहे.

या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी समाजातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. पहिल्या बॅचमध्ये प्रशिक्षण घेऊन सक्षम आरोग्य मित्र तयार झाले आहेत. यापुढेही असेच आरोग्य मित्र तयार होतील. शहरातील प्रत्येक नागरिक हे आरोग्य मित्र बनू शकतील असा या संस्थेचा मानस आहे.

या साठी तज्ज्ञ लोकांनी एकत्र येऊन प्रशिक्षणाचा कालावधी, त्याचा अभ्यासक्रम आखला होता. त्याप्रमाणे मे 2019 मध्ये जागतिक आरोग्य दिना दिवशी प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. प्रशिक्षणामध्ये अपघातग्रस्त, हृदयरोगी यांचे प्राथमिक सर्वेक्षण करून त्यांना प्राथमिक मदत करणे. पुढील उपचारासाठी योग्य त्या रुग्णालयात स्थलांतर करणे, त्यासाठी रुग्णवाहिकेचे व्यवस्थापन करणे याचा समावेश केला.

आरोग्य मित्र रुबेला गोवर लसीकरण या सारख्या इतर सरकारी योजनामध्ये सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांचे जनजागृती करणार आहेत. उपचारासाठी कुठून आणि कशा पद्धतीने मदत मिळवायची याचीही मदत करणार आहेत. तसेच आजार होऊ नये म्हणून योगाचे महत्व पटवून देणार आहेत.

आरोग्य मित्र फाऊंडेशनचे संस्थापक ऋषिकेश तपशाळकर, अध्यक्ष राजीव भावसार, प्रशासन आणि व्यवस्थापक डॉ. पवन साळवे, डॉ. अभय कुलकर्णी, सचिव अनिल पालकर, कोषाधिकारी गणेश जवळकर, कार्यवाहक डॉ. जयवंत श्रीखंडे, लोकपाल प्रवीण लडकत, सूर्यकांत मुथियान, प्रमुख सल्लागार डॉ. श्रीरंग गोडबोले, डॉ. दिलीप कानडे, डॉ. श्रीकृष्ण जोशी, डॉ. वर्षा डांगे, डॉ. शैलजा भावसार, ब्रँडअँबेसेडर लक्ष्मीकांत भावसार, आरोग्य मित्र समन्वयक स्नेहा फुलकर, लोकमान्य रुग्णालय समन्वयक उज्ज्वल केळकर, आरोग्य मित्र संघटन समन्वय मनीषा हिंगणे यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.