Chinchwad : गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यास अटक; 16 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे गुटखा विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 16 लाख 35 हजार 50 रुपये किमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 23) दुपारी सव्वा एकच्या सुमारास गोलांडे इस्टेट चिंचवड येथे करण्यात आली.

चंद्रप्रकाश पन्नालाल चौधरी (वय 28) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अरुण श्रीराम धुळे (वय 56, रा. कोथरूड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलांडे इस्टेट चिंचवड येथे एक इसम मानवी शरीरास अपायकारक असणारे पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री करीत आहे. तसेच त्याने काही गुटखा साठवून देखील ठेवला आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात माहिती घेत चंद्रप्रकाश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे 16 लाख 35 हजार 50 रुपये किमतीचा गुटखा हस्तगत केला. त्याच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like