Chinchwad: जल्लोष अन् भक्तीमय वातावरणात ‘बाप्पा’ला निरोप; दहा तास विसर्जन मिरवणूक ( व्हिडिओ)

फुलांची आणि भंडा-याची उधळण; शांततेत विसर्जन मिरवणूक

एमपीसी न्यूज – ….ढोल-ताशांचा दणदणाट…आकर्षक विद्युत रोषणाई… फुलांनी सजवलेल्या रथांची रेलचेल…लक्षवेधक चित्ररथ… गणपती बाप्पा मोरयाचा अखंड जयघोष.. एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार”, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या’… गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला…..अशा जयघोषात फुलांची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात वरुणराजाच्या जलाभिषेकात लाडक्या गणरायाला चिंचवडकरांनी गुरुवारी (दि.12) निरोप दिला. बारा वाजेपर्यंत 36 मंडळे विसर्जन घाटाकडे रवाना झाली होती. तब्बल दहा तास चाललेली विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

दुपारी दोन वाजता सुरूवात झालेली मिरवणूक रात्री बारा वाजता म्हणजे दहा तास चालली. रात्रीबारापर्यंत 36 मंडळांनी विसर्जन केले. मिरवणुक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री साडे आठ नंतर मिरवणुकीत रंगत आली. अकराच्या सुमारास वरूनराजाचे आगमन झाले. वरूनराज्याच्या जलाभिषेकातच गणरायाला निरोप देण्यात आला.

चिंचवड, चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरीक्त आयुक्त संतोष पाटील , नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.

दळवीनगर येथील गजाजन मित्र मंडळ मंडळाची विसर्जन मिरवणूक दोन वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाली. त्यानंतर सव्वा आठच्या सुमारास दळवीनगर येथील बाल तरुण मित्र मंडळाची मिरवणूक चौकात दाखल झाली. त्यांनी विठ्ठलाच्या मनोभावक मूर्तीचा देखावा उभारला होता. रात्री नऊच्या सुमारास क्रांतीविर भगतसिंह मित्र मंडळाचे बाप्पा फुलांनी सजवलेल्या पालखीतुन दाखल झाले. महिलांनी पालखी खांद्यावर घेतली होती. गावडे कॉलनी सांस्कृतिक मित्र मंडळाने आकर्षक अशी फुलांची सजावट केली होती.

चिंचवडगावातील मोरया मित्र मंडळाने ‘भवानी रथ’ साकारला होता. रथामधील महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानीची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. साई गर्जना ढोल ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. गांधी पेठ तालीम मित्र मंडळाने लक्षवेधक ‘राज-गोविंद’ रथ साकारला होता. रथामध्ये बालाजीची लक्षवेधक मूर्ती होती. मिरवणुकीत शिवदर्शन ढोल ताशा पथक सहभागी झाले होते.

चिंचवड गावातील श्री काळभैरवनाथ मित्र मंडळाने ‘गजरथ’ साकारला होता. भगवा ग्रुपच्या पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. दहाच्या सुमारास नवतरुण मित्र मंडळाचे मिरवणूक चौकात आगमन झाले. मंडळाने ‘शिवरथ’ साकारला होता. रथामध्ये मनमोहक शंकराची मूर्ती होती. शिवाज्ञा ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. मुंजोबा मित्र मंडळाने आकर्षक फुलांची सजावट केली होती.

भोई आळीतील उत्कृष्ट तरुण मित्र मंडळाने पूरग्रस्तांना मदत करतानाची ‘एनडीआरएफ’चा बोट दाखविली होती. मनसोक्त फुलांची उधळण करण्यात आली. नवभारत तरुण मंडळाने फुलांच्या सजावटीमध्ये ‘मयूररथ’ सादर केला होता. श्री समर्थ कॉलनी मित्र मंडळाने ‘समर्थरथ’ साकारला होता. तानाजीनगर येथील श्री शिवाजी उदय मंडळाने ढोल ताशाच्या दणदणाटात आणि फुलांची उधळण करत लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

लोंढेनगर येथील आदर्श तरुण मित्र मंडळाच्या मिरवणुकीत झांज पथक सहभागी झाले होते. मंडळाने ‘वाहतुकीचे नियम पाळा’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पाणी वाचविण्याचा संदेश दिला’. तसेच ‘मुलगी झाली म्हणून बाळगू नका भिती, गुणवान मुली तर देशाची संपत्ती’ अशा मजकुराचा फलक लावून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा संदेश दिला. एम्पायर एस्टेट मित्र मंडळाने आकर्षक असा रथ साकारला होता. सव्वा अकराच्या सुमारास श्री मयुरेश्वर मित्र मंडळ ढोल ताशाच्या दणदणाटात विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले. मंडळाने विद्युत रोषणाई केली होती.

गावडे पार्क मित्र मंडळाने संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा लक्षवेधक भक्ती-शक्तीचा रथ साकारला होता. गणनाद वाद्य पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. रात्री साडे अकराच्या सुमारास श्री लक्ष्मीनगर मित्र मंडळाच्या मिरवणुकीचे चौकात आगमन झाले. मंडळाची विठ्ठलाची दहा फुटाची मूर्ती नागरिकांचे लक्ष्य वेधून घेत होती.

श्रीमान महासाधू मोरया गोसावी मित्र मंडळाने आकर्षक फुलांची सजावट केली होती. शंकराची मूर्ती साकारली होती. सुदर्शन मित्र मंडळाने ‘भक्तीरथ’ साकारला होता. त्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांची मूर्ती होती. श्रीदत्त मित्र मंडळाच्या मिरवणुकीत शिव मल्हार ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. पावणेबाराच्या दरम्यान दळवीनगर राजा समता मित्र मंडळाची मिरवणूक मुख्य चौकात आली. मंडळाने श्रीकृष्ण रथ उभारला होता. ज्ञाप्रबोधिनीच्या मुलींच्या ढोल ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले.

झुंझार मित्र मंडळाने उत्कृष्ट मित्र मंडळ, छत्रपती शाहू तरुण मित्र मंडळ, राणा प्रताप मित्र मंडळ, शिवप्रसाद मित्र मंडळांनी देखील बाप्पाला जल्लोषात निरोप दिला. रात्री बारानंतर शिवदर्शन कॉलनी गणेशोत्सव दर्शन मंडळ, शिवसाई मित्र मंडळ आणि गणेश मित्र मंडळ या तीन मंडळांनी शांततेत गणरायाला निरोप दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.