Chinchwad : चित्रपट, नाट्य क्षेत्रासह लोककलावंताना शासनाकडून मदत मिळावी – भाऊसाहेब भोईर

Bhausaheb Bhoir should get help from the government in the field of film, drama and folk art

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे महाराष्ट्रातील लोककलावंत, शाहीर, ऑर्केस्ट्रा कलाकार, नाट्य कलावंत यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या कलाकार आणि कामगारांना प्रशासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी चित्रपट निर्माते व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या पत्रात भोईर यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला.  त्यामुळे शेती, उद्योग यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महाराष्ट्रातील लोककलावंत, शाहीर, ऑर्केस्ट्रा कलाकार, नाट्य कलावंत यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात स्थानिक प्रशासनाने कलाकारांना महिनाभर पुरेल इतक्या धान्याची सोय करावी.

ज्याप्रमाणे मागील काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे, तशी परिस्थिती चित्रपट, नाट्य या सांस्कृतिक  क्षेत्रातील कलावंतावर येऊ नये म्हणून सरकारने याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

भोईर पुढे म्हणाले, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र शाहीर परिषद व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सुमारे दीडशे शाखांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कलाकारांची यादी शासनाला आम्ही देऊ, या यादीमधील कलाकारांना सरकारने पक्षपात न करता मदत पोहचवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच महाराष्ट्रात होणारी विविध संमेलने, पुरस्कार सोहळे यांचा निधी कलावंतांच्या मदतीसाठी वर्ग करण्यात यावा व त्यामधून साधारण पाच ते दहा कोटी रुपयांची मदत राज्यातील कलावंत, पडद्यामागील कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांना करावी,  असेही भोईर या पत्रात म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.