Chinchwad : दृष्टीहीन संघाने जिंकला प्रेरणा चषक आणि प्रेक्षकांची मने

एमपीसी न्यूज – प्रचंड आत्मविश्वास व प्रेक्षकांची मिळालेली साथ या जोरावर दृष्टिहीन मुलींच्या प्रेरणा दृष्टिहीन संघाने डोळस मुलींच्या संघावर मात करीत विजय मिळविला. प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड व चिंचवड-पिंपरी जितो यांनी आयोजित केल्या क्रिकेट सामन्यात दृष्टिहीन संघाने साजेसा खेळ करत सामना जिंकला आणि उपस्थितांची वाह वाह मिळविली.

दृष्टिहीन व्यक्ती व डोळस व्यक्ती यांच्यात मैत्रीचे नाते घट्ट व्हावे व दृष्टिहीन व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात यशस्वी जीवन जगता यावे यासाठी प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सध्या सर्वत्र क्रिकेट फीवर सुरू आहे.भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत आहे.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना ४६ वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पिंपरीतील आण्णासाहेब मगर मैदानावर दृष्टिहीन मुली व डोळस मुलींच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रिकेट सामन्यात दृष्टिहीन संघाने सहा षटकात तीन बाद 46 धावा केल्या. जितो संघाच्या डोळस मुलींनी या धावांचा पाठलाग करताना सहा षटकात ३६ धावा केल्या. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात प्रेरणा दृष्टिहीन संघाने दहा धावांनी विजय मिळवीत प्रेरणा चषक व ११ हजारांचे पारितोषिक मिळविले. दृष्टिहीन संघाच्या किरण तलवार हिने सर्वाधिक 23 धावा करत सर्वांची मने जिंकली. कर्णधार ज्योतीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सहा षटकात निर्णायक धावसंख्या करत त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात यश मिळविले.

हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित झाले होते. विजया नंतर दृष्टिहीन संघाने जल्लोष केला. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. प्रेरणा परिवाराचे सदस्य व जितोचे पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.

प्रेरणा परिवाराचा आयकॉन असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या प्रसंगी भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आदिनाथ क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी या सामन्यासाठी सहकार्य केले. जितोचे अध्यक्ष संतोष धोका, राजेंद्र जैन यांच्यासह प्रेरणा परिवाराचे पराग कुंकुलोळ, सतीश नवले, विश्वास काशीद, नितीन शिंदे, कविता स्वामी, अमित जाधव, सचिन साकोरे, खंडूदेव कठारे, राहुल लुंकड, आदित्य जाधव, चिराग चोरडिया, नगरसेवक शितल शिंदे, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, राजेंद्र गावडे, मनीषा आबळे, दिलावर शेख, सुनील रांजने, नीता घोरपडे यांनी योगदान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.