Chinchwad : बिरला हाॅस्पीटल आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने ‘कोविड योद्धयां’चा सन्मान

एमपीसी न्यूज – आदित्य बिरला मेमोरियल हाॅस्पिटल व  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालय  यांच्या वतीने आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

बिरला हाॅस्पीटल चिंचवड येथे गुरुवारी (दि.14)  हाॅस्पीटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या उपस्थितीत हा समारंभ  पार पडला. यावेळी  पोलिस आयुक्त   बिष्णोई यांच्या हस्ते हाॅस्पीटलमधील नर्स, डाॅक्टर, पॅरामेडिकल आणि इतर स्टाफचा सत्कार करण्यात आला. बिरला हाॅस्पीटल हे पोलिसांचे कोरोना स्क्रिनिंग करण्याचे अधिकृत केंद्र आहे.

कार्यक्रमादरम्यान सगळ्यांनी मास्क परिधान केले होते तसेच ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात आले.  पोलिस आयुक्त बिष्णोई म्हणाले, कोरोनाच्या लढाईत आरोग्य कर्मचारी जे काम करत आहेत आणि ज्या प्रकारची भूमिका बजावत आहेत ती वाखाणण्याजोगी आहे. आरोग्य  कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण असल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

बिरला हाॅस्पीटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे म्हणाल्या, आपल्या सगळ्यांचे आरोग्याचे रक्षण करणारे आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.  ज्या पद्धतीने हे कर्मचारी आपले आयुष्य धोक्यात घालून समाजाची सेवा करत आहेत त्यासाठी आपण त्यांच्या कामाला सलाम केला पाहिजे.

उपस्थित लोकांनी जागेवर उभे राहून आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी यांच्या कामाला मानवंदना दिली.

दरम्यान केक कापून कार्यक्रमांचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.