Chinchwad: भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप 16 कोटी 42 लाखांचे धनी; दोन भावांसह सात जणांकडून घेतले दोन कोटीचे कर्ज

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याकडे सुमारे 16 कोटी 42 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या विविध ठिकाणी शेतजमीन आणि बिगरशेत जमीन आहेत. त्यांच्याकडे 78 हजार रुपये किमतीचे ‘रिव्हॉल्वर’ तर, 50 हजार रुपये किमतीचे घड्याळ आहे. त्यांच्याकडे एकही मोटार नाही. तर, दोन भावांसह सात जणांकडून त्यांनी दोन कोटीचे कर्ज घेतले आहे. त्यांनी पत्नीच्या संपत्तीचा तपशील स्वतंत्र दाखविला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप यांनी आज (गुरुवारी) आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिला आहे.

शेती आणि व्यवसाय ही त्यांच्या उत्पन्नाची साधने आहेत. त्यांचे शिक्षण दहावी झाले आहे. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, दि कॉसमॉस को-ऑप.बँक, दि सेवा विकास को-ऑप बँके अशा आठ बँकेत जगताप यांच्या 55 लाख 38 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लि, आयसीआयसीआय प्रोडेन्शिअल बँकींग अॅन्ड फायनान्स, दि सेवा विकास को-ऑप बँक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना अशा 19 ठिकाणी त्यांचे सुमारे 11 लाख 84 हजार 436 रुपयांचे शेअर्स आहेत. एलआयसीमध्ये 33 लाख 71 हजार रुपयांची त्यांनी गुंतवणूक केली आहे.

साई डेव्हलपर्स, चंद्ररंग डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्स, छत्रपती रामजी कळंबे, रोशनी कळंबे यांना एक कोटी 50 लाख 24 हजार रुपयांचे कर्ज त्यांनी दिले आहे. जगताप यांच्याकडे मोटार नाही. सात लाख 46 हजार रुपये किमतीचे 220 ग्रॅम सोने आणि 50 हजार रुपये किमतीचे घड्याळ त्यांच्याकडे आहे. 78 हजार रुपये किमतीचे एक रिव्हॉल्वर देखील त्यांच्याकडे आहे.

जगताप यांची खेड तालुक्यातील मरकळ येथे दोन ठिकाणी तर चाकण येथे दोन ठिकाणी शेतजमीन आहे. चालू बाजारभावानुसार दोन कोटी 60 लाख रुपये त्याची किंमत आहे. तर, पिंपळे गुरव येथे पाच ठिकाणी बिगरशेती जमीन आहे. त्याची किंमत दोन कोटी 25 लाख रुपये आहे. याशिवाय कोथरुड, पुणे येथे व्यावसायिक इमारत आहे. त्याची 45 लाख रुपये किंमत आहे. पिंपळे गुरव येथे निवासी इमारत असून त्याची किंमत पाच कोटी 46 लाख रुपये आहे.

भाऊ शंकर जगताप यांच्याकडून एक कोटी 19 लाख, विजय जगताप यांच्याकडून एक कोटी 10 लाख यासह इंद्रप्रस्थ असोसिएटस्, मंगल कदम, आशा झरेकर, बाळासाहेब झरेकर, पांडुरंग झरेकर यांच्याकडून असे एकूण दोन कोटी 64 लाख रुपये कर्ज आपण घेतले असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.