Chinchwad : घरफोडी करून साडेबारा लाखांचे 40 तोळे सोन्याचे दागिने चोरीला

पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. : burglars stole 40 tonnes of gold jewelery worth Rs 12.5 lakh

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या कालावधीत घरातील सर्वजण गावी गेल्याने बंद असलेला फ्लॅट फोडून चोरट्यांनी 12 लाख 65 हजार रुपये किमतीचे तब्बल 40 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना जून 2020 ते 3 ऑगस्ट 2020 या कालावधीत वृंदावन सोसायटी, श्रीधरनगर, चिंचवगाव येथे घडली.

सुरुवातीला फिर्यादीत 90 हजारांचे दागिने चोरीला गेल्याचा उल्लेख करण्यात आला. मात्र, नंतर लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.

अक्षय प्रवीण बंब (वय 30, रा. श्रीधरनगर, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मावस भाऊ मयूर दीपक फुलपगर (वय 30) यांचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. कोरोना विषाणूमुळे मयूर यांचे कुटुंब त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील मूळ गावी कोपरगाव येथे गेले.

दरम्यान, मयूर त्यांच्या व्यवसायाच्या कामानिमित्त 20 जुलै रोजी चिंचवड येथे आले. काम संपवून ते 23 जुलै रोजी परत कोपरगावला गेले.

गावी जाताना मयूर फ्लॅटच्या दरवाजाला लॅचलॉक लावून गेले. 3 ऑगस्ट रोजी त्यांच्या शेजारी राहणा-या एका महिलेने मयूर यांना फोन करून घरात आहात का, असे विचारले.

कारण, घराचा दरवाजा उघडा असून दरवाजावरील बेल वाजवली तरी घरातून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले.

याबाबत मयूर यांनी फिर्यादी अक्षय यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. मयूर यांच्या सांगण्यावरून अक्षय यांनी फिर्याद दिली.

अज्ञात चोरट्यांनी घरातून 35 ग्राम वजनाचा एक लाख 5 हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार आणि कानातील टोप्स, एक लाख 65 हजारांचा 55 ग्राम वजनाचा एक हार आणि कानातील टोप्स, एक लाख 50 हजारांचा 55 ग्राम वजनाचा कानातील टोप्स जोड, एक लाख 47 हजार 300 रुपयांच्या 49.1 ग्राम वजनाच्या दोन पाटल्या, 33 हजारांचे 11.86 ग्राम वजनाचे सोन्याची चेन आणि डायमंडचे पेंडंट, एक लाख 71 हजार रुपये किमतीचे 57 ग्राम वजनाचे सोन्याचे चार जोड कानातील टोप्स, 7.65 ग्राम वजनाची 21 हजार रुपये किमतीची एक सोन्याची अंगठी, 6.04 ग्राम वजनाची 18 हजार रुपये किमतीची एक सोन्याची अंगठी, 80 ग्राम वजनाच्या दोन लाख 40 हजारांच्या चार सोन्याच्या बांगड्या, 21 ग्राम वजनाचे 63 हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, 2 ग्राम वजनाची 6 हजार रुपयांची एक सोन्याची नाकातील मुरणी, 5 ग्राम वजनाचे दीड लाख रुपये किमतीचे एक जोड कानातील सोन्याचे टोप्स, लहान मुलांची एक सोन्याचे चेन, 22 ग्राम वजनाचे 66 हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे कडे आणि रोख रक्कम 62 हजार रुपये असा एकूण 12 लाख 62 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.