Chinchwad Bye Election : आचारसंहितेची ‘ऐसी की तैसी’ ; राजकीय फ्लेक्‍सकडे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज –  चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होऊन दहा दिवस उलटले तरीही चिंचवड मतदारसंघात राजकीय फलक अद्यापही (Chinchwad Bye Election ) झळकत आहेत. राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्‍स,  हटविण्यात आले नसल्याने कुठे आहे? आदर्श आचारसंहिता असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अवघ्या 15 दिवसात म्हणजे 18 जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. त्यादिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे  पोटनिवडणुकीच्या चर्चेला सुरुवात झाली.

PCMC :  उपायुक्त झाले सहाय्यक आयुक्त; निवडणुकीसाठी सचिन ढोले पदावनत

आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता समन्वय अधिकारी अस्मिता मोरे यांनी चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांना सोमवार (दि.23) रोजी पत्र पाठविले होते. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देत शहरातील सर्व राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्‍स, बोर्ड तत्काळ काढून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या होत्या.

त्यानंतरही चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक भागात राजकीय पक्षांचे फलक झळकत आहेत. त्यावर पक्षांचे निवडणूक चिन्ह देखील आहे. आचारसंहिता लागू होऊन दहा दिवस उलटले तरी प्रशासनाने फलक काढले नाहीत. त्यामुळे आचारसंहिता कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आचारसंहितेची ‘ऐसी की तैसी’ सुरू असल्याचे दिसते.

याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले म्हणाले, “मतदारसंघातील राजकीय फलक हटविण्याच्या सूचना आचारसंहिता कक्षाला दिल्या आहेत. राजकीय फलक हटविण्यात येत (Chinchwad Bye Election ) आहेत. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जाईल”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.