Chinchwad Bye Election : उमेदवारीवरुन घमासान; भाजपमध्ये दोन गट

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची (Chinchwad Bye Election) घोषणा होताच भाजपमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधु शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी एक गट तर दुसरा गट जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहे. त्यावरुन चिंचवडमधील भाजपच्या माजी नगरसेवक, पदाधिका-यांमध्ये सरळ दोन गट पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणात सुरु असून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांनीही जोर बैठकांना आरंभ केला आहे. 31 जानेवारीपासून 7 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. तोपर्यंत घडणा-या राजकीय घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे बारीक लक्ष्य आहे.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या 15 दिवसात अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. चिंचवडमध्ये 5 लाख 66 हजार 415 मतदार आहेत. त 3 लाख 1 हजार 648 पुरुष, 2 लाख 64 हजार 732 महिला आणि 35 इतर मतदार आहेत. हेच मतदार आता चिंचवडचा नवीन आमदार ठरविणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच भाजपसह भाजपविरोधकही कमालीचे सक्रिय झाले आहेत. चिंचवडमध्ये जगताप यांना माणनारा मोठा वर्ग होता. त्यांचा करिष्मा होता. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

पोटनिवडणुकीसाठी भाजपमध्ये उमेदवारीवरुन घमासान सुरु आहे. जगताप यांच्या कुटुंबातील (Chinchwad Bye Election) दोन सदस्यांसह काही माजी नगरसेवकांनीही दावा केला आहे. भाजपकडून जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी असल्याचे सांगितले जात असतानाच जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनीही ‘निवडणूक लढविण्यासाठी आपली तयारी’ असल्याचे शहर नेतृत्वाला कळविल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जगताप यांच्या कुटुंबातील दोन सदस्य उमेदवारी मागत असल्याने पक्षासमोर पेच निर्माण झाल्याचे दिसते.

अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली. तर त्यांना सहानुभूती मिळेल. त्यांना उमेदवारी दिल्यास विरोधकही माघार घेवू शकतात. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल. त्यासाठी त्यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी एक गट आग्रही आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे या ही अश्विनी जगताप यांच्या उमेदवारीसाठी सकारात्मक असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते. कार्यकाळ संपल्याने माजी झालेल्या काही महिला नगरसेविका, काही निष्ठावान पदाधिका-यांचेही अश्विनी जगताप यांच्या उमेदवारीला समर्थन असल्याचे सांगितले जाते.

wagholi : संतनगर येथील इमारतीच्या मीटर बॉक्सला आग; विद्युत मीटर जळून खाक

तर, दुसरीकडे काही महिन्यात पक्षाला महापालिका सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यासाठी शंकर जगताप यांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी एक गट कमालीचा आग्रही आहे. त्यात भाजप सत्ताकाळात पालिकेत नेते म्हणून काम केलेले, काही माजी नगरसेवक, संघटनेतील पदाधिका-यांचा समावेश आहे. त्यांच्या जोरबैठका सुरु आहेत. जगताप कुटुंबातील दोघांनी उमेदवारीवर दावा केल्याने चिंचवडमधील भाजपमध्ये सरळ दोन गट पडले आहेत. कोणाच्या बाजुने बोलावे, उभे रहावे यात काहींची कोंडी झाल्याचे दिसते.

रहाटणीतील भाजपच्याच एका माजी नगरसेवकाचा सोशल मिडीयावर (Chinchwad Bye Election) व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात भावी आमदार, राजा वही बनेगा, जो काबील होगा असा सूचक संदेश आणि उमेदवारीवरील दावेदारी दिसते. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली तर आम्ही काम करु अन्यथा आम्ही निर्णय घेवू अशी काहींनी भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजप नेतृत्वाची कोंडी झाली आहे. आगामी काळात आणखी काय-काय राजकारण घडते, पक्ष नेतृत्व यावर कसा तोडगा काढते, कोणाला उमेदवारी देता याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.

भाजपविरोधकांमध्येही जोरदार हालचाली

मागीलवेळी राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीच्या पाठिब्यांवर लढलेले राहुल कलाटे निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे. राष्ट्रवादीचे नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांची उमेदवारीसाठी फिल्डिंग सुरु आहे. त्यांनी जोर बैठकांना आरंभ केला आहे. समर्थनासाठी चाचपणी सुरु आहे. सांगवीचे नवनाथ जगताप हे ही निवडणुकीच्या रिंगणात असू शकतील. चिंचवड मतदारसंघातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मतदारसंघातील नातीगोती महत्वाची ठणार आहेत. मात्र, उमेदवारी कोणाला मिळणार यावर निवडणुकीची गणिते ठरतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.