Chinchwad Bye-Election : गुरुवारी मतमोजणी, 37 फे-या, अंतिम निकाल हाती येण्यासाठी लागणार 14 तास

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवार (दि.2) सकाळी 8 वाजल्यापासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. (Chinchwad Bye-Election) अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी सर्व प्रक्रिया विचारात घेता किमान 14 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज मतमोजणी केंद्राची पाहणी करून या ठिकाणी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. मतमोजणी प्रक्रीया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत  संबंधितांना सूचना दिल्या. निवडणूक आयोगाच्या इटीपीबीएस( इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम फॉर सर्व्हीस वोटर) या प्रणालीच्या प्रात्यक्षिक कामकाजाची चाचणीसह माहिती घेतली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या दृष्टीने निवडणूक विभागाची आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली. मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी 1 टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची (Chinchwad Bye-Election) यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शितल वाकडे, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, निवडणूक सहाय्यक प्रशांत शिंपी, ईव्हीएम कक्षाचे समन्वयक बापूसाहेब गायकवाड, टपाली मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे, डॅशबोर्डच्या समन्वयक अनिता कोटलवार यांच्यासह सहाय्य करणारे इतर अधिकारी आणि कर्मचारी या प्रक्रियेमध्ये असणार आहेत.

Alandi News : आळंदी नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा मिळाव्यात; मनसेची मागणी

प्रारंभी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करण्यात येईल. यानंतर 14 टेबलवर पहिली फेरी सुरू होईल.  टप्प्याटप्प्याने मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होतील. शेवटच्या फेरीनंतर यादृच्छिक (रँडमली) पद्धतीने व्हीव्हीपॅट काढून 5 व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल. प्रत्येक फेरीनंतर झालेल्या मतमोजणीच्या आकडेवारीची उद्घोषणा शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथून ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येणार आहे. शिवाय भारत निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in या लिंकद्वारे देखील उमेदवाराला फेरीनिहाय पडलेल्या मतांची आकडेवारी पाहता येणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे मतदान केंद्र अधिक म्हणजेच 510 आहे. तर, 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (Chinchwad Bye-Election) शिवाय झालेले मतदान देखील अधिक म्हणजेच 2 लाख 87 हजार 479 इतके आहे. या व्यतिरिक्त टपाली मतदानाचा देखील यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी सर्व प्रक्रिया विचारात घेता किमान 14 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

मतमोजणीच्या दिवशी शंकरआण्णा गावडे कामगार भवनाच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहे अशा व्यक्तींखेरिज इतरांना या भवनाच्या 100 मीटर परिसरात प्रवेश असणार नाही. मतमोजणीच्या दिवशी अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत तापकीर चौक ते थेरगाव रुग्णालयाकडे जाणारा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले आणि पोलीस अधिकारी त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. (Chinchwad Bye-Election) कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी पोलीस प्रशासनाला यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.