Chinchwad Bye Election : कोणत्याही परिस्थितीत चिंचवडची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढविणार – अजितदादांनी केले स्पष्ट

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या (Chinchwad Bye Election) पोटनिवडणुकीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांशी माझी चर्चा सुरु आहे. चिंचवडमधील जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला सुटेल असा विश्वास व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत चिंचवडची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढविणार असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांना अजित पवार यांनी आज (गुरुवारी) पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे बोलावून घेतले होते. इच्छुक असलेले भाऊसाहेब भोईर, नाना काटे, नवनाथ जगताप, मयुर कलाटे, मोरेश्‍वर भोंडवे, प्रशांत शितोळे, माया बारणे, राजेंद्र जगताप, ॲड. गोरक्ष लोखंडे, माधव पाटील यांच्याशी अजित पवार यांनी वैयक्तिकरित्या चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी एकांतात आणि पुन्हा सर्वांशी एकत्र चर्चा केली.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे, चिंचवडचे निरीक्षक आणि मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, मंगला कदम, माजी सभागृह नेते जगदीश शेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.

Pimpri News : शिवजयंतीच्या नियोजनासाठी शुक्रवारी पालिकेत बैठक

अजित पवार यांनी इच्छुक, शहरातील (Chinchwad Bye Election) पदाधिका-यांशी सविस्तरपणे चर्चा केली. चिंचवडला राष्ट्रवादीचाच उमेदवार असेल. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षाचा प्रचार सुरु करण्याच्या सूचना दिल्या.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत चिंचवडला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने अपक्ष लढलेले शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता. कलाटे यांनी 1 लाखाहून अधिक मते घेतली होती. आता अजित पवार यांनी घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले असले. तरी, महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत अजितदादा ठाम राहून राष्ट्रवादीला जागा मिळवून घेतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.