Chinchwad Bye-Election : राष्ट्रवादीकडून मयूर कलाटे यांचेही नाव चर्चेत

एमपीसी न्यूज –  चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी मंगळवारपासून सुरू होणार आहे. निवडणूक बिनविरोध होणार की लढवली जाणार ही उत्सुकता (Chinchwad Bye-Election) कायम असतानाच अनपेक्षितपणे राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक मयूर कलाटे यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे.

इतर पक्षातील उमेदवाराला पुरस्कृत करण्यापेक्षा ‘क्लीन फेस’ म्हणून कलाटे यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीतून नाराजी किंवा फंदी फितुरी होणार नाही, असा सूर आहे. यातूनच मयूर कलाटे यांचे नाव पुढे आले असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. तर,  दुसरीकडे उच्चशिक्षित, युवा चेहरा, जनसंपर्क असलेला चांगला चेहरा म्हणून मयूर कलाटे सरस ठरतील अशी चर्चा मतदारांमध्ये आहे.

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा संघर्ष पेटला होता. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार हे मावळ मधून लोकसभेसाठी उमेदवार होते.  अशा परिस्थितीमध्ये मयूर कलाटे यांनी झोकून देत पार्थ पवार यांचे काम केले. खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात थेटपणे भूमिका घेत पार्थ पवार यांचे काम मयूर कलाटे यांनी अगदी धाडसीपणे केले होते.

याच दरम्यान राष्ट्रवादीची प्रचंड प्रमाणात पडझड सुरू होती.  शहरातील अनेक नेते,  पदाधिकारी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये जात होते. मयूर कलाटे प्रतिनिधित्व करीत असलेल्या प्रभागांमध्ये बहुतांश भाजपला मानणारे मतदार आहेत. असे असताना प्रचंड जोखीम पत्करत मयूर कलाटे यांनी राष्ट्रवादीची एकनिष्ठता कायम ठेवली.

Pune : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमधून पुणेकरांची तब्बल 1 कोटी 11 लाख रुपयांची वार्षिक बचत

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सोबतच राहण्याची भूमिका ठेवत राष्ट्रवादीचे काम या मतदारसंघांमध्ये नेटाने केले.  त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत चिंचवड मतदार संघामध्ये भाजप बहुल असे वातावरण असताना मयूर कलाटे यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवली. (Chinchwad Bye-Election) राष्ट्रवादीचेच काम केले.  त्यामुळे राष्ट्रवादीने मयूर कलाटे यांना उमेदवारी दिली आणि मयूर कलाटे मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून देखील आले.

याच कालावधीमध्ये ज्येष्ठांना विरोधी पक्षनेते पदाची संधी दिली गेली. मात्र युवा चेहरा, प्रभागात तसेच आयटीयन्समध्ये जनसंपर्क असलेला चांगला चेहरा म्हणून मयूर कलाटे हे विरोधी पक्षनेते पदाचे दावेदार असताना सुद्धा त्यांना ही  संधी मिळाली नाही. तरी देखील कलाटे यांनी कोणतीही नाराजी पक्ष नेतृत्वावर दाखवली नाही. त्यानंतरही ते पक्ष नेतृत्वाशी एकनिष्ठ राहिले. याचीच बक्षीसी म्हणून कलाटे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

पोट निवडणुकीसाठी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे प्रचंड इच्छुक आहेत. शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

वेळप्रसंगी राष्ट्रवादीने आपल्याला पुरस्कृत करावे असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.  मात्र राहुल कलाटे यांना उमेदवारी दिल्यास प्रचंड नाराजी उफाळून येऊ शकते.  त्यामुळे जर मयूर कलाटे यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीकडून कोणत्याही प्रकारचा रोष  समोर येणार नाही.(Chinchwad Bye-Election)  शिवाय मयूर कलाटे आणि राहुल कलाटे हे दोघेही बंधू आहेत. त्यांच्या घरामध्ये देखील सलोख्याचे संबंध आहेत  त्यामुळे त्यांचा एकमेकांना विरोध होणार नाही.  त्यामुळे पक्षाबरोबर नागरिकांमध्ये देखील कलाटे यांच्या नावाची चर्चा आहे, असे देखील बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.