Chinchwad Bye Election : पोटनिवडणुकीची अधिसूचना उद्या, थेरगावात उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार

एमपीसी न्यूज – केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना उद्या (मंगळवारी) प्रसिद्ध (Chinchwad Bye Election) होणार आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना उद्यापासूनच 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. थेरगावातील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील तिस-या मजल्यावरील निवडणूक कक्षात उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत.

चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अवघ्या 15 दिवसात म्हणजे 18 जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. उद्या (मंगळवार) पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. परंतु, अद्यापही प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार ठरले नाहीत.

Pimpri news : टाटा मोटर्सच्या सीएसआर विभागातर्फे विद्याधनम् उपक्रमांतर्गत आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन

भाजपकडून जगताप कुटुंबातच उमेदवारी दिली जाणार आहे. पण, जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप कि बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांना उमेदवारी मिळणार हे अद्याप निश्चित झाले नाही. उमेदवार ठरविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.28) जगताप कुटुंबियांशी चर्चा केल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे.

भाजपने बिनविरोधसाठीही विरोधकांना विनंत्या केल्या आहेत. परंतु, निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असे सांगत विरोधकांनी विनंती अमान्य केल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे निवडणूक होईल असे स्पष्ट दिसत आहे.

भाजपचा उमेदवार जगताप कुटुंबातील असणार हे स्पष्ट आहे मात्र महाविकास आघाडी एकच उमेदवार देणार की स्वतंत्र लढणार याबाबत उद्याप निर्णय झालेला नाही. उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत असून प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण असणार हे अद्याप गुलदस्तात आहे.

कुठे भरता येणार उमेदवारी अर्ज?

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महापालिकेचे उपायुक्त सचिन ढोले कामकाज पाहत आहेत. चिंचवड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना थेरगावातील महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या तिस-या मजल्यावर अर्ज सादर करता येणार आहेत.

कसे आहे निवडणूक वेळापत्रक?
31 जानेवारी – उमेदवारी अर्ज भरणा प्रक्रिया सुरू

7 फेब्रुवारी – उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

8 फेब्रुवारी –  अर्जांची छाननी

10 फेब्रुवारी – अर्ज माघारीचा शेवटचा दिवस

26 फेब्रुवारी – मतदान

2 मार्च – मतमोजणी

निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले म्हणाले, ”पोट निवडणुकीची अधिसूचना उद्या (मंगळवारी) प्रसिद्ध होणार आहे. उद्यापासूनच उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात (Chinchwad Bye Election) येणार आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.