Chinchwad : अपघाताने राजकारणात आलो – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. पहिल्यापासून वकील होण्याची इच्छा होती. महाविद्यालयात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होतो. महाविद्यालयीन निवडणुका लढवत होतो. परिषदेचे सुनील आंबेकर यांनी एकेदिवशी अचानक भाजपमध्ये काम करण्यास सांगितले. परंतु, त्यास मी तयार होत नव्हतो. परंतु, आपल्याकडे ते ठरलं ते ठरलं असते असे सांगितले. त्यामुळे मी अपघाताने राजकारणात आलो असल्याचे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

चिंचवडमध्ये आज (शनिवारी) ते बोलत होते. वॉर्ड अध्यक्षापासून राजकारणात कामाला सुरुवात केली. मुख्यमंत्री असताना जीव ओतून काम केले. मला काही गमावयचे नव्हते. जे करायचे होते. ते कमवायचे होते. जीवनात कधी नकारात्मक काम केले नाही. राजकारणात कोणाला संपवायचे नव्हते. आकस ठेवून काम केले नाही. त्यामुळे आपली सकारात्मक प्रतिमा झाल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपद गेले आणि विरोधी पक्षनेतेपद आले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्रीपदाचे जॅकेट काढले आणि विरोधी पक्षनेतेपदाचे जॅकेट घातले, असेही ते म्हणाले.

जगामध्ये मंदी आहे. तरी देखील भारताची अर्थव्यवस्था नियंत्रित आहे. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था विकसित होण्याचे उद्दिष्ट आहे. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था झाल्यास रोजगार मिळेल. 2030 पर्यंत भारत विकसित राष्ट्राच्या भूमिकेत असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी महापौर उषा ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राज्य लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते एकनाथ पवार, उमा खापरे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, अमित गोरखे, महेश कुलकर्णी, सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर, नगरसेवक बाबू नायर, कामगार नेते इरफान सय्यद आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.