Chinchwad : गेल्या 41 दिवसात साडेसहा हजार जणांवर गुन्हे दाखल; 1642 वाहने जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात मागील 41 दिवसात प्रशासनाने दिलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्या सहा हजार 545 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 1 हजार 642 वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पुढील काळातही सुरू राहणार आहे.

कोरोनाचा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. हा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रथम 21 मार्च रोजी लॉकडाऊची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चपासून 21 दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला. तसेच संचारबंदीही लागू केली. या काळात केवळ जीवनावश्‍यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना यातून वगळण्यात आले. त्यानंतर 14 मार्च रोजी लॉकडाऊनचा कालावधी आणखी 19 दिवस वाढविण्यात आला. हा कालावधी 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.

महापालिका आणि पोलीस प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडतात. यामुळे खासगी वाहनांना रस्त्यावर आणण्यास मनाई करणारा आदेश पोलिसांनी काढला. एवढेच नव्हे तर फक्‍त अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांनाच इंधन देण्यास पेट्रोप पंप चालकांना सांगितले. मात्र तरीदेखील रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. यामुळे पोलिसांनी अशा टवाळखोरांवर भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात सुरवात केली आहे.

गेल्या 21 मार्च ते 29 एप्रिल या 41 दिवसाच्या कालावधीत पोलिसांनी दुकाने सुरू ठेवणारे, मोकाट फिरणारे आणि मास्क न वापरणा-या सहा हजार 545 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच यापुढील काळातही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यानच्या काळात पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही अनेकजण रस्त्यावरून दुचाकी वाहने घेऊन मोकाट फिरत होते. शहरातील अशा एक हजार 642 जणांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या वाहन चालकांवर खटला दाखल करून न्यायालयात जाण्याबाबत समजपत्र वाहन चालकांना देण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.