Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचे औपचारिक उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (बुधवारी) झाले. चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे मुख्यालय आहे. प्रवेशद्वारावरील फीत कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करून उदघाटन करण्यात आले.

उदघाटन प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चौबुकस्वार, महेश लांडगे, सुरेश गोरे, मेधा कुलकर्णी, संजय भेगडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी औपचारिक उदघाटन झाल्यानंतर आयुक्तालयाची पाहणी केली. पोलीस आयुक्तालयातील विविध शाखा, नियंत्रण कक्षाच्या पाहणीनंतर आयुक्त दालनात चर्चा झाली. यावेळी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी आयुक्तालयाच्या कार्यान्वयासाठी येणा-या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाबाबत :

महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, अमरावती, रेल्वे पोलीस आयुक्तालय ही दहा पोलीस आयुक्तालये आहेत. राज्यातील अकरावे पोलीस आयुक्तालय पिंपरी-चिंचवड शहरासाठी सुरु करण्यात आले आहे. 1998 साली दहावे पोलीस आयुक्तालय अमरावती शहरासाठी सुरु झाले. त्यानंतर वीस वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय सुरु करण्यात आले. देशात सर्वात जास्त आयुक्तालये महाराष्ट्र राज्यात आहेत. 15 ऑगस्ट 2018 रोजी आयुक्तालयाच्या कामकाजाला ऑटो क्लस्टर येथून सुरुवात झाली. महापालिका पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून चिंचवड मधील प्रेमलोकपार्क येथे पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र इमारत मिळाली. या इमारतीची डागडुजी करून 1 जानेवारी 2019 पासून आयुक्तालयाच्या कारभार नवीन स्वतंत्र इमारतीमधून सुरु झाला.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. आयुक्तालयासाठी 4 हजार 600 पदे मंजूर झाली आहेत. मात्र सध्या केवळ २ हजार कर्मचारी आणि अधिकारी उपलब्ध आहेत. चाळीस लाखांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या शहराच्या सुरक्षेसाठी केवळ दोन हजार पोलीस काम करत आहेत. 223 चारचाकी आणि 143 दुचाकी अशी एकूण 366 वाहनांची आवश्यकता आहे. मात्र सद्यस्थितीत केवळ 52 वाहनांवर आयुक्तालय धावत आहे. सध्या आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळाली असली तरी ती भाडेतत्वावर वापरण्यासाठी मिळाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयासाठी 100 एकर जमिनीची आवश्यकता आहे. त्यामुळे पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड, उजळणीवर्ग, खेळाची मैदाने, शस्त्रागार, यासोबतच बॉम्ब शोधक नाशक पथक, श्वान पथक, गंगा काबू पथक, राखीव पोलीस दल यांसारखे विभाग सुरु करता येणार आहेत.

चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून महाळुंगे पोलीस ठाण्याचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यांनतर त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी लागणार आहेत. काही पोलीस ठाण्यांच्या भौगोलिक सीमा बदलाची अभ्यास प्रक्रिया सुरु आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही अभ्यास प्रक्रिया संपणार असून त्याबाबतही प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.