Chinchwad : चिंचवडमधील मतदानाचा घसरलेला टक्का तारणार की मारणार?

चिंचवडमध्ये 53 टक्के मतदान, तीन टक्क्यांनी मतदान घटले

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. चिंचवडमध्ये केवळ 53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2014 च्या निवडणुकीत झालेल्या 56.30 टक्के मतदानपेक्षा यावेळी तीन टक्क्यांनी मतदानाच्या टक्केवारीत घसरण झाल्याने घसरलेला टक्का उमेदवारांना तारणार की मारणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. घसरलेला टक्का भाजपच्या लक्ष्मण जगताप यांची हॅटट्रिक हुकविणार की राहुल कलाटे यांना धक्का देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ राज्यातील दोन नंबरचा मोठा मतदारसंघ आहे. चिंचवडमध्ये दोन लाख 76 हजार 927 पुरुष आणि दोन लाख 41 हजार 980 महिला आणि इतर 32 असे एकूण पाच लाख 18 हजार 309 मतदार आहेत. त्यामध्ये 495 दिव्यांग मतदारांचा तर 171 सैनिक मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी सुमारे पावणेतीन लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. 53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

चिंचवडमधील भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप आणि अपक्ष निवडणूक लढविलेले शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह 11 जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणा-या चिंचवडमधील लढाईमध्ये शेवटच्या टप्प्यात चुरस निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने खेळी करत भाजपचा मित्र पक्ष असलेल्या आणि अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी पाठिंबा दिला. कलाटे यांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या मतदानामध्ये घट झाली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात यंदा 53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा तीन टक्के कमी मतदान झाले आहे. 2014 च्या निवडणुकीत 56.30 टक्के मतदान झाले होते.  यावेळी घसरलेला मतदानाचा टक्का कोणाला तारणार आणि कोणाला मारणार? या बाबत तर्क-विर्तक लढविले जात आहेत.

चिंचवड मतदार संघातील मतदानाचा टक्‍का

वर्ष             टक्केवारी

2009 –      50.53
2014 –      56.30
2019 –      53.00

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.