Chinchwad : कर्म हिच सर्वश्रेष्ठ भक्ती – हभप प्रा. विलास गरवारे

एमपीसी न्यूज – वसुंधरेची निर्मिती करताना परमेश्वराने प्रत्येक जीव, जंतूला बल, बुध्दी दिली आहे. बल, बुध्दीचा सुयोग्य वापर करुन प्रत्येकाने आपल्या कर्मातच परमेश्वर शोधावा. कर्म हिच सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. हे संत सावतामाळी महाराजांनी कृतीतून दाखवून दिले असल्याचे मत हभप प्रा. विलास गरवारे यांनी केले.

श्री गजानन महाराज (शेगांव) यांच्या 141व्या प्रगटदिनानिमित्त तानाजीनगर चिंचवड येथील श्री गजानन सत्संग मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शनिवारी (दि.24) श्रींच्या गाभा-यात ‘गजानन विजय ग्रंथमधील चौदाव्या अध्यायातील नर्मदा नदी प्रसंग’ हा आकर्षक देखावा करण्यात आला होता. शनिवारी पहाटे श्रींना पुष्पजलाचा अभिषेक करण्यात आला.

  • सकाळी ब्रम्हचैतन्य आणि गोंदवलेकर महाराज मंडळाच्या वतीने सकाळची आरती करण्यात आली. तसेच राजू शिवतरे आणि आधार ब्लड बॅंक यांच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. पिंपळे सौदागर मधील श्रीराम महिला भजनी मंडळ, चिंचवड मधील श्रीराम व स्वरमुग्धा भजनी मंडळ यांनी भजन सादर केले.

यावेळी निरुपण करताना हभप प्रा. विलास गरवारे यांनी म्हटले की, परमेश्वराने दिलेले जीवन अमुल्य आहे. त्याने दिलेल्या डोळ्याने त्याचे रुप पहावे. मुखाने त्याचे नाम घ्यावे, कानाने त्याच्या अभंगाचे श्रवण करावे. मात्र, हे करताना कर्म विसरु नये. संत सावतामाळी महाराजांनी आपल्या कर्मातूनच परमेश्वराची निस्सिम भक्ती केली. त्यांच्या भक्तीमुळे विठ्ठलाला उदार होऊन त्यांना दर्शन देण्यासाठी अरणगावी यावे लागले. प्रत्येक मनुष्याला मृत्यूची भिती आहे. देव उदार आहे. देवाचे औदार्य अनंत आहे. जन्म मृत्यूतून अभयदान मिळवायचे असेल तर आपल्या कर्मातच परमेश्वर शोधला पाहिजे, असेही हभप प्रा. गरवारे यांनी सांगितले. त्यांना हार्मोनियमवर हेमंत गरवारे आणि तबल्यावर रघुवीर केंच यांनी साथसंगत दिली.

  • सोमवारी (दि. 25) सकाळी नऊ वाजता हभप अनंत महाराज शास्त्री दैठणकर (परभणी) यांचे किर्तन. दुपारी पावणे बारा वाजता श्रींची प्रगटवेळ आणि गजर, दुपारी बारा वाजता श्रींची महाआरती नंतर सायंकाळी पाचपर्यंत महाप्रसाद, रात्री साडेदहा वाजता पसायदानाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

कार्यक्रमांच्या आयोजनात श्री गजानन सत्संग मंडळांचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे, उपाध्यक्ष किशोर कदम, कार्यवाह प्रताप भगत, सहकार्यवाह श्रीपाद जोशी, खजिनदार विष्णू पूर्णये, सहखजिनदार दत्तात्रय सावकार, सल्लागार रमाकांत सातपुते, श्रीकांत अणावकर, सभासद बाळकुष्ण मराठे, संजय खलाटे, देविदास कुलथे व गजानन भक्तगण व सेवेकरी यांनी सहभाग घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.