Chinchwad : रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने गुरुवारपासून ‘शिशिर व्याख्यानमाला’

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ चिंचवड-पुणे यांच्या वतीने ‘शिशिर व्याख्यानमाला’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार (दि. 17) ते रविवार (दि. 20) या कालावधीत सायंकाळी 6 वाजता चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खूला ठेवण्यात आला आहे. व्याख्यानमालेचे यंदा 22वे वर्ष आहे. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सी.ए. किशोर गुजर उपस्थित होते.

शिशिर व्याख्यानमालेचे उदघाटन गुरुवारी (दि. 17) सायंकाळी सहा वाजता पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर अॅड. असीम सरोदे यांचे ‘न्यायालयाच्या पाय-यावरून येणारी लोकशाही’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. पहिल्या दिवशी वसंतराव पाटोळे यांना सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शुक्रवारी (दि. 18) प्रसिद्ध वक्ते आणि सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘सावरकर आज असते तर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी प्रांत 3131चे प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी (दि. 19) दीपक करंजीकर हे ‘आजचे जागतिक अर्थकारण आणि भारत’ विषयावर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमासाठी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रोटो डी इंजिनिअरिंग, चाकण येथील प्रदीप लोखंडे आणि दीपक शिंदे यांना व्यवसाय नैपुण्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.

रविवारी (दि. 20) ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते शिवाजी साटम यांची प्रकट मुलाखत होईल. डॉ. शिल्पागौरी गणपुले या ही मुलाखत घेणार आहेत. यानंतर खंडणी व दरोडा विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत आणि वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांना सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.