Chinchwad : जिजाऊ नावाच्या विद्यापीठातून शिवाजी महाराज घडले -अॅड. सीमा तरस

एमपीसी न्यूज – “राजमाता जिजाऊंच्या अनेक संस्कारांपैकी एक जरी संस्कार अंगीकारला; तर किमान पन्नास शिवाजी आणि संभाजी निर्माण होतील. शिवाजी या नावामध्ये ऊर्जा आणि ताकद होती; कारण जिजाऊ नावाच्या विद्यापीठातून शिवाजी महाराज घडले” असे मत व्याख्यात्या अॅड. सीमा तरस चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवड येथील शिवमंदिर प्रांगणात महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शिवशंभो फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेत ‘दख्खनचे युवराज शंभूराजे’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना अॅड. सीमा तरस बोलत होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.

  • यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेवक तुषार हिंगे, उद्योजक आबा नागरगोजे, उद्योजक अनिल खैरे, डॉ. शिवाजी शेळके, किशोर सोमवंशी, व्याख्यानमाला समन्वयक राजेंद्र घावटे, शिवशंभो फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. संजय तोरखडे उपस्थित होते.

अॅड. सीमा तरस म्हणाल्या, अगदी बालवयापासून जिजाऊ माँसाहेबांनी शिवरायांवर अनेक संस्कार केलेत. त्याचप्रमाणे त्यांनी बाल शंभुराजांनादेखील संस्कारित केले. पुरंदरच्या तहात औरंगजेबाने आठ वर्षांच्या शंभुराजांना ओलिस ठेवून घेतले. सुसंस्कृत असलेल्या शंभुराजांनी खानदानी अदब ठेवून मिर्झा राजे यांच्याशी आदराने व्यवहार केला. मिर्झा राजांशी बुद्धिबळ खेळताना युवराज शंभुराजांनी आपल्या बुद्धीची चुणूक दाखवीत त्यांना हार पत्करण्यास भाग पाडले. दिलेरखानाने कुत्सितपणे शंभुराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला असताना आपल्या हजरजबाबीपणा आणि चातुर्याने त्यांनी दिलेरखानाला निरुत्तर केले.

  • दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए-खास या औरंगजेबाच्या दरबारात ताठ मानेने डोळ्याला डोळा भिडवून शंभुराजे औरंगजेबासमोर उभे राहत असत. जिजाऊंच्या शिकवणुकीमुळे शंभुराजांच्या ठायी बुद्धी चातुर्य, स्वाभिमान ओतप्रोत भरलेला होता. सुमारे एकोणीस भाषा त्यांना अवगत होत्या. आपल्या अल्प कारकिर्दीत एकशेवीस लढाया करून अजिंक्य राहिलेल्या युवराज शंभुराजांनी जिजाऊंनी संकल्पिलेले आणि शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य शर्थीने वाढविले. राणी येसुबाईंची स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार म्हणून नियुक्ती करून शंभुराजांनी आपला स्त्री सन्मानाचा संस्कार सार्थ ठरवला.

दुर्दैवाने, आपल्याच माणसांच्या फंद-फितुरीमुळे शंभुराजांच्या वाट्याला बदनामी आली; तसेच स्वकीयांच्या दगाबाजीमुळे वयाच्या केवळ बत्तिसाव्या वर्षी त्यांना औरंगजेबाच्या सैन्याने कैद केले. असे असले तरी खुद्द औरंगजेबाचा या गोष्टीवर विश्वास नव्हता म्हणून शंभुराजांना जेव्हा दरबारात पेश केले गेले, तेव्हा औरंगजेब सिंहासनावरून उठून उभा राहिला. शंभुराजांनी स्वराज्याची गोपनीय माहिती द्यावी म्हणून औरंगजेबाने जंग जंग पछाडले; परंतु शंभुराजांनी त्याला दाद दिली नाही. कुटिल कारस्थान रचून शंभुराजे आणि त्यांची पत्नी दुर्गाराणी, कन्या कमळजा यांची औरंगजेबाने भेट घडवून आणली; परंतु तरीही शंभुराजांनी स्वराज्याची गुपिते उघड न केल्याने अत्यंत अमानुषपणे त्यांचा छळ करण्यात आला.

  • अनन्वित अत्याचार सोसून शंभुराजांनी अखेरपर्यंत आपला स्वाभिमान सोडला नाही म्हणून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. आजही भामा-भीमा आक्रोश करीत ‘व्यर्थ न हो शंभुराजांचे बलिदान!’ असा आपल्याला संदेश देत आहेत. आज महाराष्ट्र जिजाऊंचे संस्कार तसेच शंभुराजांचे बलिदान विसरत चालला आहे. ते संस्कार आणि स्वाभिमान अंगी बाणवणे गरजेचे आहे.”

विविध संदर्भ देत आणि रोमांचकारी ऐतिहासिक प्रसंगांचे कथन करीत अॅड. सीमा तरस यांनी आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
अॅड. रूपाली तोरखडे, दीपाली भोईटे, अरुणा घोळवे, ज्योती भुसे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सविता बारवकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.