Chinchwad : पीएमपीएमएल बस कंडक्टरने अंध विद्यार्थ्याच्या लगावली कानशिलात; कंडक्टरविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अंध विद्यार्थ्याकडे तिकीट काढण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने चिढलेल्या पीएमपीएमएल बस कंडक्टरने अंध विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली. तसेच त्याला शिवीगाळ देखील केली. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज (दि. 17) सकाळी साडेदहाच्या सुमारास मोरया बसस्टॉप चिंचवडगाव येथे घडली.

पांडुरंग रामचंद्र खरसळे (रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) या विद्यार्थ्याने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बेकराई डेपोचा बस कंडक्टर प्रमोद मालुसरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांडुरंग हे अंध आहेत. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेतात. आज काही कामानिमित्त ते चिंचवडगाव येथे येत होते. त्यांनी पुणे विद्यापीठ येथून हडपसर ते चिंचवडगाव (बस क्रमांक 204/16) जाणारी बस पकडली. ब्रेमेन चौकात बस आली असता आरोपी कंडक्टरने पांडुरंग यांच्याकडे तिकीट मागितले.

पांडुरंग यांचा पास घरी राहिल्याने त्यांनी दोन हजार रुपयांची नोट तिकिटासाठी दिली. कंडक्टरने सुट्ट्या पैशांची मागणी केली. सुट्टे पैसे नसल्याचे पांडुरंग यांनी सांगितले असता कंडक्टरने फिर्यादी यांचे खिसे तपासले. यावरून चिढलेल्या कंडक्टरने ‘तुम्हा आंधळ्या लोकांची नेहमीची नाटकं आहेत’ असे म्हणत पांडुरंग यांना शिवीगाळ केली आणि कानशिलात लगावली. याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.