Chinchwad :  शहर पोलिसांनी बनवली सॅनिटायझर व्हॅन; शहरातील 65 चेकपोस्टवरील सर्व कर्मचारी दररोज होणार सॅनिटाइज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका दिवसात सॅनिटायझर व्हॅन तयार केली असून, गुरुवार (दि. 9) पासून ती सेवेत दाखल होणार आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते बुधवारी (दि. 8) या व्हॅनचे उदघाटन करण्यात आले. या व्हॅनमधून शहरातील  65 चेकपोस्टवरील सर्व कर्मचा-यांचे दररोज निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.

 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात एकूण 65 चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत. पोलीस जीवाची रिस्क घेऊन कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत. मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवॉश यांचे वाटप केल्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी केवळ एका दिवसात सॅनिटायझर व्हॅन बनवली आहे.

 

सॅनिटायझर व्हॅनचे उदघाटन बुधवारी पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन झाले. या व्हॅनमध्ये निर्जंतुकीकरण करण्याची यंत्रणा बसविण्यात आली आहे. 30 सेकंद या व्हॅनमध्ये थांबल्यास व्यक्तीचे संपूर्ण निर्जंतुकीकरण होते. महापालिकेकडून यासाठी रसायन पुरविले जाणार आहे. गुरुवारपासून ही व्हॅन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या 65 चेकपोस्टवर फिरणार आहे.

 

व्हॅन चेकपोस्टवर आल्यानंतर सोशल डिस्टन्स राखून प्रत्येक कर्मचारी सॅनिटायझर व्हॅनमध्ये जाईल. 30 सेकंदानंतर कर्मचारी निर्जंतुक होऊन बाहेर येईल. ड्युटी करत असताना केवळ हॅट धुणे, हॅन्डवॉश बाळगणे एवढ्या सुविधा पुरेशा नाहीत. तर संपूर्ण शरीराचे निर्जंतुकीकरण होणे गरजेचे आहे. त्याच उद्देशाने ही व्हॅन बनविण्यात आली आहे. चेकपोस्टवर कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक कर्मचा-याचे दिवसातून एकदा निर्जंतुकीकरण करण्याचे नियोजन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे.

 

“वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्ही एक दिवसात सॅनिटायझर व्हॅन तयार केली आहे. गुरुवार पासून या व्हॅनचे काम सुरू होणार आहे. या व्हॅनमध्ये सॅनिटायझर सिस्टीम आम्ही स्वतः बसवली असून पिंपरी चिंचवड पोलिसांची ही निर्मिती आहे. पोलिसांच्या सुरक्षेसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.” ए.  एन.  सय्यद -पोलीस निरीक्षक, मोटार परिवहन विभाग.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.