Chinchwad : यशस्वी व्हायचे असेल तर स्पर्धेला घाबरू नका – कृष्णकुमार गोयल

एमपीसी न्यूज- सध्याचा काळ स्पर्धेचा असून यशस्वी होण्यासाठी या स्पर्धेमध्ये उतरावे लागणार आहे. त्यामुळे स्पर्धेला घाबरू नका असे मार्गदर्शन सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल यांनी केले. चिंचवड येथील कमला शिक्षण संस्था संचालित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड कॉम्प्युटर स्टडीज आणि प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.कॉम, बी.एस्सी., बी.बी.ए., बी.एड. पदवी परिक्षेत विशेष गुण मिळविलेल्या सुमारे 47 विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभात ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य बाबसाहेब सांगळे, डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. जयश्री मुळे आदी उपस्थित होते.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, ” महाविद्यालयात शिक्षण घेत असताना जे आत्मसात केले जाते ते परीक्षेच्या माध्यमातून मिळालेल्या गुणातून दिसून येते. पदवी घेतली, पुढे काय ? अनेकजण याचा विचार करताना आढळून येत नाहीत. ते इतरांवर अवलंबून असतात. परंतु, चार ते पाच टक्के विद्यार्थी सुरवातीपासूनच ध्येय डोळ्यासमोर ठेवतात. भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्न पहा. त्यासाठी इच्छाशक्ती, कष्टाची तयारी ठेवा. तुम्ही जसा विचार कराल तसे घडेल त्यातूनच आत्मविश्‍वासही वाढत जातो. मोबाईल मुळे जग हातात आहे. त्याचा योग्य वापर केला तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सध्याचा काळ स्पर्धेचा असून यशस्वी होण्यासाठी विविध भाषेवर प्रभुत्व मिळवा. कोणताही व्यवसाय करणे सोपे नसून त्यासाठी जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा अंगिकारला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही” आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करताना शिक्षण घेत असलेली संस्था, प्राध्यापक व मित्रांना विसरू नका. सामाजिक उत्तरदायित्व जोपासा असेही आवाहन केले.

डॉ. दीपक शहा म्हणाले, “आज पदवी घेताना जो आनंद व उत्साह आहे, त्याचबरोबर तुमच्या मनात अनेक स्वप्ने आहेत. या महाविद्यालयात सोनेरी आयुष्य जगलात, आता पुढे जगात माझे काय स्थान आहे, ते निर्माण करण्यासाठी तुमच्या प्रत्येकांच्या मनात वेगळ्या वाटेवर जावून आपली कल्पना साकार करण्याची उर्जा तुमच्यात असली पाहिजे. रुळलेल्या वाट सोडून वेगळा विचार करणाराच यशस्वी होतो. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचे विश्व तयार करण्याचे स्वप्न उराशी बाळगा”

प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे म्हणाले, “येथील शिक्षण संस्था महाविद्यालयातील मुलांचे प्रोत्साहन वाढविणे, त्याची कार्यक्षमता वाढविणे यात प्रतिभा महाविद्यालयाचा हातखंडा आहे. तुम्ही मैत्री जोपासा त्यात श्रीमंती गरिबी महत्वाची नसते, शिक्षणानेच माणूस घडतो. नवनिर्माण तंत्रज्ञान आत्मसात करा, खर्‍या जगात स्वतःला सिध्द करायचे आहे. ज्ञान नसेल तर आजच्या बेरोजगारात भर घालणार आहात याची जाणिव सतत ठेवा”

सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा गोगटे यांनी केले. पदवी प्रमाणपत्र वितरणाचे वाचन डॉ. श्रृती गणपुले व डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी तर आभार डॉ. जयश्री मुळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.