Chinchwad Corona News : मर्सिडीज बेंझ व मलेशिया मराठी मंडळाकडून पिंपरी चिंचवड पोलिसांना ऑक्सिजन काँसंट्रेटर प्रदान

एमपीसी न्यूज – मर्सिडीज बेंझ कंपनीकडून 20, तर मलेशिया मराठी मंडळाचे गजानन डोईजोड यांच्याकडून तीन ऑक्सिजन काँसंट्रेटर पिंपरी चिंचवड पोलिसांना देण्यात आले. ऑक्सिजन काँसंट्रेटर प्रदान करण्याचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 20) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झाला.

या वेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, मर्सिडीज बेंझ कंपनीचे एमडी सीईओ मार्टिन श्वेनक, ग्राहक सेवा व कॉर्पोरेटचे शेखर मिडे, व्ही पी डेमलर वित्तीय सेवा प्रसाद साळुंके, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वचे प्रमुख मंदार कुलकर्णी, प्रशासन प्रमुख सारंग जोशी, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) नंदकुमार पिंजण आदी उपस्थित होते.

सध्या देशामध्ये कोरोना या संसर्गजन्य रोगाची साथ सुरु आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे समाजातील सर्व स्तरावर मिसळुन कोरोना बद्दलच्या नियमांची अंमलबजावणी व्हावी याकरीता आपले कर्तव्य बजावीत असतात. त्यामुळे कोरोनाची बाधा होण्याची शक्यता ही सर्वात जास्त पोलीसांना असते. कोरोना विरोधी लढ्यामध्ये पोलीस हे फ्रंटलाईन वॉरीयर्स म्हणून काम करीत आहेत.

सद्यपरिस्थिती लक्षात घेता हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनयुक्त बेड मिळणे जिकरीचे झाल्यामुळे पोलीसांचे मनोबल खचून जाऊ नये, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कर्तव्यादरम्यान कोरोना साथीच्या रोगाची लागण झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांपैकी ज्यांची ऑक्सिजनची पातळी खालावली आहे, त्यांच्यावर घरीच उपचार व्हावेत आणि ऑक्सिजनची पातळी वाढून प्रकृतीत सुधारणा व्हावी या उद्देशाने हे ऑक्सिजन काँसंट्रेटर देण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोनाबाधीत पोलिसांची खालावलेली ऑक्सिजन पातळी वाढविण्याच्या दृष्टीने मर्सिडीज बेंझ कंपनीकडून 20 तसेच मलेशिया मराठी मंडळाचे गजानन डोईजोड यांच्याकडून तीन, असे एकूण 23 ऑक्सिजन काँसंट्रेटर देण्यात आले. या ऑक्सिजन काँसंट्रेटरची क्षमता एक ते सात लिटर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.