Chinchwad : अरेच्चा ! अपहरण नव्हे… हे तर प्रेमी युगुलाचे भांडण

सतर्क नागरिकाचा पोलीस नियंत्रण कक्षास अपहरणाचा कॉल आल्याने पोलिसांची एकच धावपळ

एमपीसी न्यूज – तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवताना बघितल्याने एका सतर्क नागरिकाला हा अपहरणाचा प्रकार असल्याचा भास झाला. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवर हा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलिसांची एकच धावपळ उडाली. पण पोलिसांनी कार चालकाला काही तासाच्या आत शोधून काढले अन घटनेची शहानिशा केली. हे अपहरण नाही तर एका प्रेमी युगुलाचे भांडण होते, हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.
ही घटना आज (गुरुवारी) घडली. चिंचवडला राहणारी ती हिंजवडीतील एका आयटी कंपनीत कामाला आहे. तर तो शेअर मार्केटचे काम करीत आहे. ते दोघे विवाहित असून त्यांची फेसबुकवरून मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आज दुपारी चारच्या सुमारास तरुणी कामावर निघाली. वाटेत तिचा प्रियकर तिला भेटला. त्याचे आणि तिचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर त्याने तिला कामावर सोडविण्यासाठी कारमध्ये बसण्यास सांगितले. पण रागावलेली ती ऐकायला तयार नाही. काही वेळ हा शाब्दिक विनंतीचा प्रकार झाला. पण शेवटी त्याने बळाचा वापर करून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. तो तिला तिच्या कामावर सोडूनही आला.

मात्र ही घटना पाहणाऱ्या एका दक्ष नागरिकाला त्या तरुणीचे अपहरण झाल्याचे वाटले. त्यांनी तात्काळ पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून हकीकत सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नियंत्रण कक्षातून पोलीस ठाण्यांना कळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सगळ्या पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि कर्मचारी रेडी फॉर पोजिशन झाले. आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी, खंडणी विरोधी पथक यासह अन्य विविध पथकांना माहिती देण्यात आली. वाकड, हिंजवडी, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागोजागी नाकाबंदी करण्यात आली.

अवघ्या काही वेळेतच तरुणाला वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कारसह ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले. पण तरुणी कारमध्ये नव्हती. पोलिसांची भीती वाढली. पोलिसांनी मोटार चालकाला ताब्यात घेत खाक्‍या दाखविला आणि त्या तरुणीबाबत विचारणा केली. त्याने तिला हिंजवडी मधील कंपनीत कामावर सोडल्याचे सांगितले. तरुणासह पोलिसांनी संबंधित कंपनी गाठली. तरुणी कंपनीत सुखरूप असल्याची खात्री केली. दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा जबाब घेण्यात आला. एकंदर प्रकरणात अपहरणाचा प्रकार नसून ती केवळ प्रेमी युगुलाचे भांडण असल्याचे समजताच यावर हसावे का? असा प्रश्न पडला.

पण या घटनेत पिंपरी चिंचवड पोलिसांची वाढलेली कार्यतत्परता लक्षात आली. अगदी काही वेळेत सर्व सूत्रे हलवून संबंधिताला ताब्यात घेतले. हा अपहरणाचा प्रकार नसल्याचे संपूर्ण घटना उघडकीस आल्यानंतर समजले. पण तोपर्यंत प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अतिशय कार्यतत्परतेनेच काम करत होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.