Chinchwad: कोविड रुग्णांचे हाल, रुग्णांना मिळत नाहीत किट; अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांचे दुर्लक्ष

Chinchwad: covid patients do not get kits; Additional Commissioner Ajit Pawar Ignoring कोविड रुग्णांना तीन-तीन दिवस आवश्यक साहित्याची किट दिली जात नाही. किट देण्यात देखील भेदभाव केला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

एमपीसी न्यूज- चिंचवड, मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांचे हाल होत आहे. प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात नाही. कोविड रुग्णांना तीन-तीन दिवस आवश्यक साहित्याची किट दिली जात नाही. किट देण्यात देखील भेदभाव केला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. दरम्यान, रुग्णांना किट देण्याची जबाबदारी असलेले आणि भांडार विभागाचे प्रमुख पालिकेचे वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. कोविड रुग्णांवर महापालिकेसह खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

महापालिका कोविड रुग्णांसाठी लाखो रुपयांचा खर्च करत आहे. परंतु, रुग्णांना मात्र योग्य ती सेवा मिळत नाही. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आवश्यक साहित्य वेळेत दिले जात नाही.

जेवणाचा दर्जा देखील चांगला नाही. त्यामुळे रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिका लाखो रुपये कशावर खर्च करत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या वकील महिलेने ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले की, कोरोनाची लक्षणे दिसताच मी स्वत:हून टेस्ट केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मी तात्काळ रुग्णालयात दाखल होण्यासाठी आले. पण, दाखल करुन घेण्यासाठी तीन तासांचा कालावधी घेतला. दाखल झाल्यानंतर मी साबण, ब्रश, बकेट, ग्लास, टॉवेल, सॅनिटायझरची बॉटल असलेल्या किटची मागणी केली.

माझ्याअगोदर सर्वांना किट देण्यात आले आहे. माझ्यानंतर आलेल्या काही रुग्णांना देखील किट देण्यात आल्या. पण, मी दररोज मागणी करत असतानाही किट दिले जात नाही. दोन दिवसांत मला डिस्चार्ज मिळणार आहे. अद्यापही मला किट मिळालेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

रुग्णांच्या किटची जबाबदारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे आहे. पण, त्यांचे या कामाकडे अजिबात लक्ष नाही.  त्यांना रुग्णांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. पवार फोन देखील उचलत नाहीत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

भांडार विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, ईएसआय हॉस्पिटलला पालिका किटचा पुरवठा करते. पुरेशा किट हॉस्पिटलला दिल्या आहेत.

दरम्यान, या रुग्णालयात रुग्णांच्या जेवणामध्ये अळ्या, माशा आढळण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. रुग्णांना सकस व दर्जेदार जेवण दिले जात नाही. सर्व सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत.

हॉस्पिटलची सुरक्षा यंत्रणा अत्यंत तकलादू असून ती अधिक सक्षम करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.