Chinchwad crime : बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या पाच, तर दारूभट्टी लावणाऱ्या एकावर कारवाई

एमपीसी न्यूज – अवैध धंद्यांवर पिंपरी-चिंचवड पोलीस मोकळ्या हाताने कारवाई करत आहेत. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा चंग पिंपरी चिंचवड पोलिसांनी बांधला असून दररोज दारू विक्रेत्यांसह दारूभट्टी लावणा-यांवर तसेच जुगार, मटका, ऑनलाईन लॉटरी, वेश्या व्यवसायावर देखील छापे टाकले जात आहेत. सोमवारी पोलिसांनी दिघी आणि चाकण मध्ये पाच दारू विक्रेत्यांवर, तर आळंदी येथे दारूभट्टी लावणा-या एकावर कारवाई केली आहे.

विश्वजित बबलू सरकार (वय 27, रा. दिघी गावठाण), रवींद्र रामचंद्र शिंदे (वय 31, रा. बोपोडी) या दोघांवर बेकायदेशीरपणे दारू विकल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी कारवाई केली आहे. दोघांकडून प्रत्येकी 4 हजार 992 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 96 बाटल्या जप्त केल्या आहेत.

चाकण पोलिसांनी अनिल उर्मिला पुजारी (वय 28, रा. भांबोली) याच्यावर कारवाई करून त्याच्याकडून 3 हजार 29 रुपयांच्या देशी दारूच्या 19 बाटल्या, इम्पिरियल ब्ल्यू दारूच्या पाच बाटल्या, बॅक पायपर व्हिस्की विदेशी दारूच्या दोन बाटल्या, टू बर्ग कंपनीच्या तीन बाटल्या, बडवायझर कंपनीच्या तीन बाटल्या जप्त केल्या.

_MPC_DIR_MPU_II

दुस-या कारवाईत चाकण पोलिसांनी पवन प्रकाश शेट्टी (वय 24, रा. तुकाराम नगर, तळेगाव) याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून 5 हजार 658 रुपये किमतीच्या देशी, विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

तिस-या कारवाईत अजय मोहन पाताळ बन्शी (वय 32, रा. खालूंब्रे) याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून 2 हजार 496 रुपये किमतीच्या देशी दारू, बिअरच्या बाटल्या जप्त केल्या.

आळंदी पोलिसांनी भीमा नदीच्या काठावर कोयाळी गावात सुरु असलेल्या एका गावठी दारूच्या भट्टीवर छापा मारून 83 हजार 250 रुपयांचे दारू बनविण्याचे रसायन, तुरटी, सरपण आणि 300 किलो गूळ जप्त केला. मोहन संभा रजपूत (रा. कोयाळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.