Chinchwad Crime News : गुन्हे शाखेकडून दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक; चार लाखांच्या दहा दुचाकी जप्त

हे चोरटे मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरत असत. : Crime Branch arrests two inn thieves; Ten two-wheelers worth Rs 4 lakh seized

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हे चोरटे मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरत असत. दुचाकी चोरायची, मन भरेपर्यंत फिरवायची आणि नंतर भोसरी पुलाखाली सोडून द्यायची, असा या चोरट्यांचा सपाटा सुरु होता. कधी पैशांची चणचण भासली तर चोरटे चोरलेल्या दुचाकी विकूनही टाकत होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

स्वप्निल राजू काटकर (वय 19, रा. मोहनदास राजपुत चाळ, दिघीरोड, आदर्शनगर, भोसरी), राहुल मोहन पवार (वय 19, रा. मधुबन सोसायटी, क्रमांक 2, चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 9) गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस भोसरी परिसरात गस्त घालत होते.

त्यावेळी पोलीस शिपाई गणेश सावंत आणि नितीन खेसे यांना माहिती मिळाली की, भोसरी उड्डाणपुलाच्या खाली आळंदी रोड येथे दोघेजण संशयितरीत्या थांबले आहेत. त्यांच्याकडे दुचाकी आहेत.

या माहितीनुसार पोलिसांनी उड्डाणपुलाच्या खाली सापळा लावला आणि आरोपी स्वप्नील व राहुल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही दुचाकींबाबत विचारपूस केली असता त्या दुचाकी चोरीच्या असल्याचे समोर आले.

पोलिसांनी दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आणखी आठ दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. आरोपींनी चोरलेल्या दुचाकी लपवलेल्या ठिकाणी नेऊन सर्व दुचाकी काढून दिल्या. या कारवाईत पोलिसांनी चार लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

जप्त केलेल्या दुचाकिंमध्ये चार स्प्लेन्डर, तीन होन्डा ॲक्टीवा, एक पॅशन, एक शाईन व एक डीओ मोपेड या दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या सर्व दुचाकी आरोपींनी भोसरी, एमआयडीसी भोसरी, खडकी, सांगवी परिसरातून चोरल्या आहेत.

यातील आठ दुचाकींच्या बाबतीत गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात एक, भोसरी आणि खडकी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन आणि सांगवी पोलीस ठाण्यातील तीन असे एकूण आठ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

इतर दोन दुचाकींच्या बाबतीत अद्याप गुन्हे दाखल झालेले नाहीत. त्यातील हिरो होंडा स्प्लेंडर बाबत मूळ मालकाला पोलिसांनी संपर्क केला असता त्याने याबाबत त्याची काहीही तक्रार नसल्याचे सांगितले.

दुसरी एक दुचाकी नागपूर येथील आहे. ती दुचाकी आरोपींनी संगमनेर येथून चोरी केली होती. त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

मौजमजा करण्यासाठी आरोपी दुचाकी वाहने चोरी करत असत. चोरलेली वाहने मन भरेपर्यंत फिरवून भोसरी उड्डाणपुलाखाली पार्किंगमध्ये सोडून देत असत.

पैशांची चणचण भासल्यास त्यातील काही दुचाकी ओळखीच्या लोकांना विकायच्या आणि कागदपत्र नंतर देतो म्हणून त्यांनाही फसवायचे, असा प्रकार हे आरोपी करीत होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पाकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रविंद्र गावंडे, सचिन उगले, गणेश सावंत, विजय मोरे, विशाल भोईर, नितीन खेसे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.