Chinchwad : मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेकडून अटक; पाच दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. मंगळवारी (दि. 19) नाशिक रस्त्यावरील गोडाऊन चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. 

आकाश शेषराव निदगोरे (वय 19, रा. रानतारा कॉलनी, मोशी), शिवाजी गुरुनाथ हुलगे (वय 19, आदर्षनगर, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन सराईत दुचाकी चोरटे नाशिकफाटा गोडाऊन चौक येथे जंजीर हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती युनिट एकचे पोलीस शिपाई गणेश सावंत यांना मिळाली.

त्यानुसार युनिट एकच्या पथकाने सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असणाऱ्या दुचाकीबाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी भोसरी, एमआयडीसी आणि चाकण परिसरातून दुचाकी चोरल्या असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

चोरटे हे मौजमजेसाठी दुचाकी चोरत असून वापरून झाल्यानंतर दुचाकी मोकळ्या जागेत लावून निघून जात असल्याचे समोर आले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, प्रमोद लांडे, सचिन उगले, गणेश सावंत, विजय मोरे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.