Chinchwad Crime : परराज्यात चोरलेल्या गाड्यांना भंगारातील गाड्यांसह चॅसी लावून विकणारी टोळी जेरबंद; 1 कोटी 39 लाखांच्या 13 कार जप्त

एमपीसी न्यूज – गॅरेज चालवणारा एकजण काही साथीदारांच्या मदतीने परराज्यात वाहनचोरी करायचा. चोरलेल्या वाहनांना जुन्या खरेदी केलेल्या वाहनांचे चॅसी बसवायचे आणि त्या कार मनमानी किमतीला विकायच्या. अशा प्रकारे कार चोरी, विक्री करणाऱ्या मास्टरमाईंडला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून एक कोटी 39 लाखांच्या 25 कार आणि 15 इंजीन जप्त केले आहेत.

मनजित जोगिंदरसिंग मारवा (रा. चिंचवड. मूळ रा. नवी दिल्ली), दीपक चमनलाल खन्ना (वय 40, रा. नवी दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी चनप्रीत हरविंदरपाल सिंह (वय 43, रा. रावेत) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2020 मध्ये पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी परराज्यातून कार चोरून त्या महाराष्ट्रात विकणा-या एका टोळीला पकडले होते. त्यांच्याकडून इनोव्हा, फोर्च्युनर सारख्या महागड्या 12 कार आणि 15 इंजिन असा 2 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपीकडून दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड राज्यातील एकूण 9 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले होते. दरम्यान, आरोपीचा साथीदार दिल्ली येथे पळून गेला होता. जानेवारी पासून गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस त्या आरोपीच्या मागावर होते.

पळून गेलेला आरोपी हा या गुन्ह्यातील मास्टरमाइंड होता. तपास करत असताना 24 ऑक्टोबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील आणि पोलीस शिपाई सचिन मोरे यांना माहिती मिळाली की, यातील प्रमुख आरोपी आणि त्याचा साथीदार दिल्ली येथून वाहन चोरी करून ती दोन्ही वाहने घेऊन मुंबईहून पुण्याकडे येत आहेत.

त्यानुसार पोलिसांनी मोशी, खेड आणि सुपा टोलनाक्यावर सापळा लावला. दोन दिवस आणि एक रात्र पोलीस टोलनाक्यावर आरोपींची वाट पाहत थांबले. मोशी टोलनाक्याजवळ आरोपी आले असता त्यांना पोलिसांनी लावलेल्या सापळ्याचा सुगावा लागला. त्यामुळे ते चोरीची वाहने घेऊन पळून जाऊ लागले.

पोलिसांनी तब्बल 30 किलोमीटर आरोपींचा पाठलाग करून त्यांना इनोव्हा आणि क्रेटा या दोन महागड्या कारसह ताब्यात घेतले. त्या दोन्ही गाड्या त्यांनी दिल्ली येथून चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 4 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपींकडून चार इनोव्हा, फोर्च्यूनर, मारुती इर्टीगा, मारुती स्विफ्ट, होंडा सिटी, टोयोटा इटीओस, अल्टो, निसान टेरेनो, क्रेटा, महिंद्रा बोलेरो कॅम्पर अशा एकूण 1 कोटी 39 लाखांच्या 13 गाड्या जप्त केल्या.

आरोपींना चोरीच्या गाड्या विकण्यासाठी मदत करणारे प्रतिक उर्फ नागेश छगन देशमुख (वय 28, रा. खोपोली, रायगड), हारुण शरीफ शेख (वय 39, रा. चिखली) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्यांमध्ये लुधियाना, दिल्ली, पंचकुला, चंदीगड, हरियाणा येथील पोलीस ठाण्यात सात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अन्य वाहनांबाबत पोलीस तपास करीत आहेत.

अशी व्हायची कारची रीमॉडेलिंग

आरोपी मनजित याने कोंढवा परिसरात नवीन गोडाऊन घेऊन त्यात गॅरेज सुरु केले होते. अपघात झालेल्या कार विमा कंपनीकडून कमी किमतीत खरेदी करायच्या. त्यानंतर त्याच कंपनी आणि मॉडेलच्या कार हरियाणा, दिल्ली, पंजाब येथून चोरायच्या. चोरी केलेल्या कारला विमा कंपनीकडून खरेदी केलेल्या कारचे चॅसी बसवायचे. त्यानुसार नवीन कागदपत्रे तयार करायची आणि कार विकायची.

साडेतीन कोटींच्या कार, इंजिन जप्त

दोन टप्प्यात पोलिसांनी 25 महागड्या कार, 15 इंजिन असे एकूण 3 कोटी 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व कार आरोपींनी दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड या राज्यातून चोरून आणत होते. जप्त केलेल्या कारपैकी 16 कार बाबत गुन्हे दाखल आहेत. अन्य वाहनांच्या मूळ मालकांबाबत तपास करीत आहेत.

आरोपी मनजित याच्या विरोधात दिल्ली, हरियाना येथे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी दीपक खन्ना याच्या विरुद्ध दिल्ली, हरियाना, पंजाब येथे एकूण 38 गुन्हे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उप आयुक्त, (परिमंडळ 1) आनंद भोईटे सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे, तसेच कर्मचारी सुभाष सावंत, रविंद्र गावंडे, प्रमोद लांडे, अमित गायकवाड, बाळु कोकाटे, मनोजकुमार कमले, सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, मारूती जायभाये, सचिन मोरे, प्रमोद गर्जे, सुनिल चौधरी, प्रमोद हिरळकार, अंजनराव सोडगिर , आनंद बनसोडे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.