Chinchwad Crime : घरफोडी करून सहा लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – चिंचवडेनगर वाल्हेकरवाडी येथे जय गुरुदत्त कॉलनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सहा लाख नऊ हजारांचे सोन्याचे दागिने आणि दहा हजारांची रोकड असा एकूण सहा लाख 19 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना रविवारी (दि. 4) पहाटे उघडकीस आली आहे.

संगीता हनुमंत गोफणे (वय 50, रा. गुरुदत्त कॉलनी, चिंचवडेनगर) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता गोफणे त्यांच्या मुलीला सोडविण्यासाठी कुर्डूवाडी येथे त्यांच्या पतीसोबत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगा एकटाच घरात होता. शनिवारी (दि. 3) रात्री आठ वाजता मुलगा देखील त्याच्या मित्राकडे कामानिमित्त बालेवाडी येथे गेला होता. मित्राकडील काम झाल्यानंतर तो रविवारी पहाटे साडेतीन वाजता घरी आला.

त्यावेळी मुलाला घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. घरातील सामान देखील अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच कपाटाचे दरवाजे उघडे होते. रविवारी सकाळी फिर्यादी घरी आल्या असता त्यांनी घरातून चोरी झालेल्या दागिन्यांची खात्री केली.

त्यामध्ये सहा तोळे सोन्याचे गंठण, पाच तोळ्यांचे गंठण, पावणे तीन तोळ्यांचे शोर्ट गंठण, एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, आणखी एक सोन्याची अंगठी, एक तोळ्याचे सोन्याचे कानातले असे सहा लाख नऊ हजारांचे पावणे सोळा तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

तसेच चोरट्यांनी घरातून दहा हजारांची रोख रक्कम देखील चोरून नेली आहे. रविवारी रात्री याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.