Chinchwad Crime News : अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा; 36 ग्राहक, 5 वेटरवरही कारवाई

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी येथे एका अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुकानातील तब्बल 36 ग्राहक आणि 5 वेटर यांच्यावर देखील आर्थिक दंडाची कारवाई केली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी (दि. 1) केली.

मयुर बोडके, विनायक कांजोळे, आश्विन चौबे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सामाजिक सुरक्षा पथकाला गुरुवारी माहिती मिळाली की, वाल्हेकरवाडी येथे चंद्रमा हॉटेलमध्ये विनापरवाना लोकांची गर्दी करुन दारु विक्री होत आहे. त्यानुसार पोलिसांनी चंद्रमा हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये हॉटेल मालकाने ग्राहकांना बसण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती.

त्यांना खादयपदार्थ पुरवून मानवी सुरक्षितता धोक्यात येईल तसेच कोरोना साथीच्या रोगाचे संसर्ग पसरवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केल्याचे पोलिसांना आढळले.

याबाबत हॉटेल मालकाकडे कोणताही शासकीय परवाना नव्हता. हॉटेलमधून 25 हजार 570 रुपयांच्या बियरच्या बॉटल, दारूचा साठा आणि 2 हजार 550 रोख रक्कम जप्त केली. हॉटेलमध्ये दारू प्यायला बसलेल्या तब्बल 36 ग्राहक आणि 5 वेटरकडून प्रत्येकी 500 प्रमाणे एकूण 20 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तीन जणांवर भारतीय दंड विधान कलम 269, 188, 34, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई), साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम 2005 चे कलम 51 (ब), महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ अशोक डोंगरे, सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनिल शिरसाट, भगवंता मुठे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, योगेश तिडके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.