Chinchwad crime news : एसीपी डॉ. कवडे यांचा ‘अंतर्गत सुरक्षा सेवा पदका’ने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे ( ACP Dr.  Sagar kavade) यांचा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मिळालेले ‘अंतर्गत सुरक्षा सेवा पदक’ (Internal Security Service Medal’)  देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit pawar) यांनी गौरव केला.

शिवाजीनगर, पुणे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ( Republic Day)  (मंगळवारी, दि. 26) आयोजित कार्यक्रमात डॉ. कवडे यांना पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सन्मानित केले.

नक्षल विरोधी अभियानात ( Anti-Naxal Campaign) डॉ. कवडे यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांनी अनेक नक्षल विरोधी अभियानाचे नेतृत्व केले. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीचा सुद्धा त्यांनी यशस्वीपणे सामना केला. नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग शोधून पोलीस आणि सर्वसामान्य नागरिकांची जीवित हानी त्यांनी टाळली आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी तीन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण ( Surrender of Naxals) घडवून आणले.

गडचिरोली जिल्ह्यात वाचन संस्कृती रुजावी, तिचा विस्तार व्हावा, यासाठी दुर्गम भागातील 33 पोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्रात ‘प्रोजेक्ट ज्ञानगंगा’ अंतर्गत वाचनालये उघडण्यात आली. तसेच ती सर्वांसाठी खुली करण्यात आली.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या मनावरील डावे विचार पुसून त्यांच्यात लोकशाहीचे विचार रुजविण्यासाठी ‘महात्मा गांधी विचारधन परीक्षा’ हा उपक्रम डॉ. कवडे यांनी राबवला. शहिद जवानांचे कुटुंबीय, नक्षल पीडित तसेच मृत नक्षलवाद्यांचे कुटुंबीय यांच्या पंखात बळ देण्यासाठी ‘प्रोजेक्ट अग्निपंख’ या उपक्रमांतर्गत जीवनावश्यक आणि रोजगाराभिमुख वस्तूंचे वाटप करण्यात आले.

डॉ. कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शांततेचे पुस्तक वाचनासाठी सर्वात मोठा जनसमूह’ हा उपक्रम राबविण्यात आला. 3 मार्च 2018 रोजी राबविलेल्या या उपक्रमाची गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. यामुळे गडचिरोली हे गाव जगाच्या नकाशावर आले. गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत सामाजिक सदभाव पोहोचविण्यासाठी ‘सामाजिक सदभाव’ परीक्षा घेण्यात आली. त्यात सात हजार 325 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

गडचिरोली जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करताना डॉ. कवडे यांनी नक्षलविरोधी अभियान, नक्षलविरोधी प्रोपगंडा, कम्युनिटी पोलिसिंग, गुन्हे तपास, कायदा-सुव्यवस्था अशा सर्व आघाडयांवर उत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच राज्य शासनाचे ‘विशेष सेवा पदक’ देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आले.

सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी तीन वर्ष गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात उत्तम पोलीस सेवा बजावली आहे. त्यांनी बजावलेल्या कठीण व खडतर कामगिरीबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांना ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.